(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS: वर्ल्ड रेकॉर्डपासून रोहित फक्त दोन षटकार दूर; टी-20 क्रिकेटमध्ये गाठणार विक्रमी टप्पा, गप्टिलला टाकणार मागं
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात उद्यापासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे.
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात उद्यापासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्माकडं (Rohit Sharma) टी-20 क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. तर, न्यूझीलंडचा तडाखेबाज फलंदाज मार्टिन गप्टिल पहिल्या स्थानावर आहे. मार्टिन गप्टिलला मागं टाकण्यासाठी रोहित शर्माला फक्त दोन षटकारांची आवश्यकता आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये मार्टिन गप्टिल सध्या अव्वल स्थानावर आहे. मार्टिन गप्टिलच्या नावावर सर्वाधिक 172 षटकारांची नोंद आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 171 षटकार मारले आहेत. त्यानंतर वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल (124 षटकार) तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत 120 षटकारांसह इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन चौथ्या क्रमांकावर आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच 117 षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार-
क्रमांक | फलंदाज | देश | षटकार |
1 | मार्टिन गप्टिल | न्यूझीलंड | 172 |
2 | रोहित शर्मा | भारत | 171 |
3 | ख्रिस गेल | वेस्ट इंडीज | 124 |
4 | इयॉन मॉर्गन | इंग्लंड | 120 |
5 | आरोन फिंच | ऑस्ट्रेलिया | 117 |
रोहित शर्माची यंदाच्या वर्षातील कामगिरी
यंदाचं वर्ष रोहित शर्मासाठी आतापर्यंत चांगलं ठरलंय. त्यानं आतापर्यंत 17 सामन्यात 26.43 च्या सरासरीनं 423 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याच्या बॅटीतून दोन अर्धशतकं झळकली आहेत. तर, त्याची सर्वोत्तम धावसंख्या 72 इतकी आहे. या वर्षी रोहित शर्मानं आतापर्यंत 21 षटकार लगावले आहेत. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेशी तीन-तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्माच्या बॅटमधून आणखी काही षटकार पाहायला मिळू शकतात.
हे देखील वाचा-