IND vs AUS 3rd Test | सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व, पुकोवस्की आणि लाबुशेनची अर्धशतके
IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाने गाजवला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात 166 धावा केल्या होत्या.
सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस सुरुवातीला पाऊस मग यजमान ऑस्ट्रेलियाने गाजवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात 166 धावा केल्या होत्या. मार्नस लाबुशेन नाबाद 67 आणि स्टीव स्मिथ नाबाद 31 धावांवर खेळत आहेत. दरम्यान पावसामुळे पहिल्या दिवशी फक्त 55 षटकांचाच खेळ झाला. भारतासाठी नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
याआधी नाणेफेक गमावल्यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारतीय संघाने चौथ्या षटकातच्या तिसऱ्या चेंडूवरच डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली. त्याने केवळ पाच धावाच केल्या. मोहम्मद सिराजने वॉर्नरला माघारी धाडलं. यानंतर आठवच्या षटकाच्या पहिल्या चेंडूनंतर पावसाने सुरुवात केली आणि खेळ थांबला. पहिल्या सत्रात केवळ 7.1 षटकांचाच खेळ झाला, ज्यात ऑस्ट्रेलियाने एक विकेट गमावून 27 धावा केल्या होत्या. पुकोवस्की 14 आणि मार्नस लाबुशेन दोन धावांवर नाबाद होता.
दुसऱ्या सत्राचा खेळही निर्धारित वेळेवर सुरु होऊ शकला नाही. मैदान अतिशय ओलं होतं. जेव्हा खेळ सुरु झाला तेव्हा पुकोवस्की आणि लाबुशेनने सांभाळून अर्धशतकी भागीदारी रचली. या दरम्यान पुकोवस्कीला अनेक वेळा जीवदान मिळालं. एकट्या रिषभ पंतनेच दोन वेळा त्याचा झेल सोडला. मात्र कसोटीत पदार्पण करणाऱ्या पुकोवस्कीने 110 चेंडूंमध्ये 62 धावांची शानदार खेळी रचून आपल्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत चार चौकार लगावले. याशिवाय दुसऱ्या विकेटसाठी लाबुशेनसोबत 100 धावांची भागीदारीही रचली.
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या विल पुकोवस्कीची विकेट भारतीय कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने घेतली. सैनीने त्याला पायचित केलं.
106 धावांवर दुसरी विकेट पडल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. दोघांनी बिनधास्त फलंदाजी केल्या भारतीय गोलंदाजांवर दबाव आला. मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात संघर्ष करणाऱ्या स्मिथने अश्विनसह सर्व भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला.
लाबुशेन 149 चेंडूत 67 धावा करुन नाबाद आहे. त्याने आपली खेळी आठ चौकारांनी सजवली. तर स्मिथ 64 चेंडूंमध्ये 31 धावा करुन मैदानात तळ ठोकून आहे. त्याने पाच चौकार लगावले. यासोबतच दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 60 धावा जमा केल्या आहेत.