IND vs AUS 3rd Test | सिडनीच्या मैदानात मोहम्मद सिराजला हुंदका, राष्ट्रगीत सुरु असताना भावुक
IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी राष्ट्रगीत सुरु असताना मोहम्मद सिराज अतिशय भावुक झाला आणि त्याला त्याचे अश्रू रोखता आले नाहीत.
सिडनी : कोणत्याही खेळाचा सामना सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणणं हे कोणासाठी भावुक लक्ष असतो. आपल्या देशाचं राष्ट्रगीत ऐकताना किंवा म्हणताना अंगावर रोमांच आलं नाही तरच नवलं. राष्ट्रगीत सगळ्यांमध्येच स्फुल्लिंग चेतवतं. असंच काहीसं घडलं भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या बाबतीत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी राष्ट्रगीत सुरु असताना मोहम्मद सिराज अतिशय भावुक झाला आणि त्याला त्याचे अश्रू रोखता आले नाहीत.
भारतीय क्रिकेट संघ मेलबर्नमध्ये विजय मिळवून सिडनीत पोहोचला आहे. भारताने मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत आठ विकेट्सनी विजय मिळवला. तर त्याआधीच्या अॅडलेड कसोटी भारताचाअतिशय लाजिरवाणा पराभव झाला होता.
सामन्याच्या आधी राष्ट्रगीत सुरु झालं तेव्हा सिराजच्या डोळ्यात पाणी आलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मोहम्मद सिराज भावुक झाल्याचं दिसतं.
✊ #AUSvIND pic.twitter.com/4NK95mVYLN
— cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2021
मोहम्मद सिराजने मेलबर्न कसोटीत एकूण पाच विकेट्स घेतल्या होत्या. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पाच विकेट्स घेणारा मोहम्मद सिराज हा मोहम्मद शमीनंतरचा गोलंदाज ठरला आहे. 2013 मध्ये मोहम्मद शमीने वेस्ट इंडीजविरुद्ध नऊ विकेट्स घेतल्या होत्या. सिराजने सिडनीमधील तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने डेव्हिड वॉर्नरला चेतेश्वर पुजाराकरवी झेलबाद केलं.
आपला दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने मेलबर्नमधील सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मागील वर्षी 20 नोव्हेंबर रोजी सिराजचे वडील मोहम्मद गौस यांचं हैदराबादमध्ये निधन झालं होतं. त्यावेळी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात येऊन काही दिवसच झाले होते. बीसीसीआयने त्याला परतण्याचा पर्याय दिला होता. परंतु त्याने संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला. शिवाय कोरोनाच्या नियमांमुळेही भारतात परतण्यात अडचणी होत्या.