IND vs AUS 3rd ODI | 'या' बदलांसह दोन्ही संघ मैदानात उतरण्याची शक्यता, संभाव्य प्लेईंग इलेव्हन
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात नवदीप सैनीच्या ऐवजी जलदगती गोलंदाज टी नटराजनला पदार्पणाची संधी मिळू शकते. याशिवाय शुभमन गिल आणि कुलदीप यादवही संघात पुनरागमन करु शकतात.
IND vs AUS | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज कॅनबरामध्ये खेळवला जाणरा आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात मोठे बदल करण्याची शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ देखील मालिका जिंकल्याने आपल्या काही खेळाडूंना विश्रांती देऊ शकतो.
चहलच्या जागी कुलदीपला संधी मिळण्याची शक्यता फिरकीपटू युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरल्याचं दिसलं. त्याने पहिल्या सामन्यात 10 षटकात 89 धावा दिल्या तर दुसऱ्या वन डेमध्ये 9 षटकात 71 धावा दिल्या होत्या. अशातच तिसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली त्याच्याऐवजी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संधी देऊ शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कुलदीपची कामगिरी चांगली आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे.
मयांकऐवजी शुभमनला संघात स्थान? सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल दोन्ही सामन्यात वेगाने धावा काढण्याच्या प्रयत्नात स्वस्तात माघारी परतला होता. पहिल्या वनडेमध्ये 22 धावा करणारा मयांकला दुसऱ्या सामन्यात 28 धावाच करता आल्या. चांगल्या सुरुवातीनंतरही मयांकला मोठी धावसंख्या उभारता आली आहे. त्यामुळे त्याच्याजागी शुभमन गिलला संधी मिळू शकते.
टी नटराजनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता जलदगती गोलंदाज नवदीप सैनीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत कमाल दाखवू शकला नाही. पहिल्या सामन्यात 10 षटकात 83 धावा देणाऱ्या सैनीने दुसरे वनडेत सात षटकांमध्येच तब्बल 70 धावा दिल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली सैनीऐवजी टी नटराजनला पदार्पणाची संधी देऊ शकतो. तसंच शार्दुल ठाकूरही सैनीला रिप्लेस करु शकतो.
ऑस्ट्रेलियाच्या संघातही मोठे बदलं? मालिकेतील दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या वनडेमध्ये काही खेळाडूंना आराम देण्याची शक्यता आहे. डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्यासोबतच मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. यांच्याऐवजी सीन अबॉट आणि डॅनियल सॅम्स यांना अंतिम अकरामध्ये संधी मिळू शकते.
भारताचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन शिखर धवन, मयांक अग्रवाल/शुभमन गिल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, टी नटराजन, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन अॅरॉन फिन्च (कर्णधार), मॅथ्यू वेड, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मोजेज हेन्रिक्स, अॅलेक्स कॅरी, सीन अबॉट, मिशेल स्टार्क, अॅडम जम्पा आणि जोश हेजलवूड.