IND vs AUS 3rd ODI: कांगारुंनी गोलंदाजी फोडली, भारताला विजयासाठी 353 धावांचे विराट आव्हान
IND vs AUS : अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकात सात विकेटच्या मोबदल्यात ३५२ धावांपर्यंत मजल मारली.

IND vs AUS 3rd ODI 1st Innings Highlights: अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकात सात विकेटच्या मोबदल्यात ३५२ धावांपर्यंत मजल मारली. मिचेल मार्श याने ९६ धावांची वादळी खेळी केली. तर डेविड वॉर्नर ५६, स्मिथ ७४ आणि लाबुशेन ७२ यांनीही मोठे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराह याने तीन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाला क्लिनस्वीप देण्यासाठी भारताला ३५३ धावांचे आव्हान आहे.
अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी दणक्यात सुरुवात करत हा निर्णय सार्थ ठरवला. मिचेल मार्श आणि वॉर्नर यांनी वादळी सुरुवात केली. आठ षटकत दोघांनी ७८ धावांची सलामी दिली. डेविड वॉर्नर ५६ धावांवर तंबूत परतला. वॉर्नरने चार षटकार आणि सहा चौकारंच्या मदतीने ३४ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. वॉर्नर बाद झाल्यानंतर स्मिथनेही वेगाने धावा केल्या. स्मिथ आणि मिचेल मार्श यांच्यामध्ये शतकी भागिदारी झाली. दोघेही वेगाने धावा काढत होते. अखेर कुलदीप यादव याने मिचेल मार्श याला ९६ धांवावर बाद करत जोडी फोडली. मिचेल मार्शने १३ चौकार आणि तीन षटकार ठोकले. मार्श बाद झाल्यानंतर स्मिथही तंबूत परतला. स्मिथने ६१ चेंडूत झटपट ७४ धावांचे योगदान दिले. यामध्य एक षटकार आणि आट चौकारांचा समावे होता.
स्मिथ आणि मार्श तंबूत परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. पण दुसऱ्या बाजूने लाबूशेन चिवट फलदाजी करत होता. अॅलेक्स कॅरी ११ धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलही पाच धावा काढून तंबूत परतला. विस्फोटक कॅमरुन ग्रीन यालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. कॅमरुन ग्रीन नऊ धावांवर बाद झाला. दुसरीकडे मार्नस लाबूशेन याने अखेरपर्यंत झुंज दिली. ४९ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर लाबुशेन बाद झाला. मोठा फटका मारण्याच्या नादात लाबुशेन बाद झाला. त्याला बुमराहने तंबूत धाडले. लाबुशेन याने फक्त ५८ चेंडूत वेगाने ७२ धावा जोडल्या. यामध्ये नऊ चौकारांचा समावेश होत. अखेरीस पॅट कमिन्स याने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाची धवसंख्या ३५० पार नेली.
भारताच्या वेगवान गोलंदाजांना चांगलाच मार बसला. बुमराह आणि सिरजही ऑस्ट्रेलियाच्या तडाख्यातून वाचले नाहीत. जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या पण त्यासाठी धावाही खर्च केल्या. बुमराहने दहा षटकात तब्बल ८१ धावा खर्च केल्या. तर प्रसिद्ध कृष्णाने पाच षटकात ४५ धावा दिल्या. मोहम्मद सिराजने ९ षटकात ६८ धावा दिल्या. सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. रविंद्र जाडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांना विकेट मिळाली नाही, पण त्यांनी भेदक मारा केला. कुलदीप यादव याने सहा षटकात ४८ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला आज निर्धाव षटक फेकता आले नाही.




















