मोहम्मद शामीचा पंच, कांगारुंची 276 धावांपर्यंत मजल, शार्दूल ठरला महागडा
IND Vs AUS, Innings Highlights : मोहम्मद शामीच्या भेदक माऱ्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाला 276 धावांत रोखण्यात यश आले.
IND Vs AUS, Innings Highlights : मोहम्मद शामीच्या भेदक माऱ्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाला 276 धावांत रोखण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय जोश इंग्लिश, स्टिव्ह स्मिथ आणि लाबुशेन यांनी महत्वाचं योगदान दिले. त्याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स याने अखेरीस जबराट फिनिशिंग टच दिला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकात २७६ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून मोहम्मद शामी याने पाच विकेट घेतल्या. अश्विन याचेही दमदार कमबॅक झाले. मोहाली वनडे जिंकण्यासाठी भारताला २७७ धावांचे आव्हान आहे.
भारताचा कर्णधार केएल राहुल याने मोहालीमध्ये नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला आमंत्रित केले. पहिल्याच षटकत मिचेल मार्शला बाद करत मोहम्मद शामीने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. पहिल्या षटकात विकेट पडल्यानंतर डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. स्मिथने संयमी फलंदाजी केली तर डेविड वॉर्नर याने हल्लाबोल केला. दुसऱ्या विकेटसाठी १०६ चेंडूत ९४ धावांची भागिदारी केली. रविंद्र जाडेजाने डेविड वॉर्नरला बाद करत जोडी फोडली. डेविड वॉर्नर याने दमदार अर्धशतक ठोकले. वॉर्नरने ५३ चेंडूत दोन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली. डेविड वॉर्नर बाद झाल्यानंतर स्मिथही लगेच तंबूत परतला. स्मिथने ४१ धावांचे योगदान दिले. स्मिथने एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ४१ धावांची खेळी केली.
मार्नस लाबुशेन याने ३९ धावांची खेळी केली. कॅमरुन ग्रीन याने ३१ धावांची खेळी केली. लाबुशेन आणि ग्रीन या दोघांनी प्रत्येकी तीन तीन चौकार ठोकले. वॉर्नर आणि स्मिथ यांच्याशिवाय स्टॉयनिस आणि जोश इंग्लिंश यांनी चांगली भागिदारी केली. या दोघांनी ४३ चेंडूत झटपट ६२ धावांची भागिदारी केली. लाबुशेन आणि ग्रीन यांच्यामध्ये ४५ धावांची भागिदारी झाली. स्मिथ, लाबुशेन, ग्रीन आणि जोश इंग्लिंश यांना चांगली सुरुवात मिळाली, पण त्यांना मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. इंग्लिंश याने ४५ धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन षठकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. पॅट कमिन्स याने अखेरच्या षटकात झटपाट धावा काढल्या. कमिनस याने नऊ चेंडूत २१ धावांचे योगदान दिले.
भारताकडून मोहम्मद शामी याने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. शामीने दहा षटकात ५१ धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. त्याशिवाय जसप्रीत बुमराह, रविंचंद्र अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. शार्दूल ठाकूर महागडा गोलंदाज ठरला. शार्दूल ठाकूर याने दहा षटकात ७८ धावा खर्च केल्या. शार्दूलला एकही विकेट घेता आली नाही. शार्दूल ठाकूरच्या दहा षटकात ११ चौकार आणि एक षटकार गेला. शार्दूल वगळता एकाही गोलंदाजाने प्रति षटक सहा पेक्षा जास्त धावा खर्च केल्या नाहीत.