(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध सामन्यापूर्वी सुनील गावस्कर यांच्याकडून भारतीय संघाला महत्वाचा सल्ला
IND Vs NZ: उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारताला 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे.
T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानकडून 10 विकेट्सने पराभव पत्कारावा लागला. उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारताला 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध (India Vs New Zealand) विजय मिळवणे आवश्यक आहे. या महत्वाच्या सामन्यापूर्वी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघाला सल्ला दिला आहे. न्यूझीलंडविरुद्ध दुबईत खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भारतीय संघ त्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणता बदल करू शकतो, याविषयी त्यांनी आपले मत मांडले आहे.
स्पोर्ट्स टॉकशी संवाद साधताना गावस्कर म्हणाले की, "पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसेल तर, त्याच्या जागी ईशान किशन चांगला पर्याय ठरू शकतो. ईशान सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. याचबरोबर भुवनेश्वर कुमारच्या जागेवर शार्दुल ठाकूरचा विचार केला शकतो. पण याव्यतिरिक्त आणखी काही बदल केल्यास भारत घाबरला आहे, असे विरोधकांना वाटेल."
"हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी केली नाही. मात्र, बुधवारी त्याने नेटमध्ये गोलंदाजी केली. यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. जर तुम्ही एखाद्या चांगल्या संघाकडून सामना गमावला असेल तर याचा अर्थ असा नाही की भारत सामना जिंकणार नाही किंवा पुढे जाऊन स्पर्धा जिंकणार नाही. पुढचे चार सामने जिंकल्यास उपांत्य फेरीत आणि तेथून अंतिम फेरीत जाता येईल," असेही सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाने सुपर-12 फेरीतील त्यांचा पहिला सामना गमावला आहे. यामुळे पुढील सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहे.
संबंधित बातम्या-