Women World Cup India Vs Bangladesh : हॅमिल्टन येथे झालेल्या महिला विश्वचषक (Women's World Cup 2022) स्पर्धेत भारतीय महिला संघाने बांगलादेशवर 110 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. फिरकीपटू स्नेह राणाने बांगलादेशच्या फलंदाजांना कोंडीत पकडत महत्त्वाच्या चार विकेट्स घेतल्या. भारताने बांगलादेशला 230 धावांचे लक्ष्य दिले होते. विजयासाठी 230 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 40.3 षटकांत अवघ्या 119 धावांत सर्वबाद झाला. सलमा खातूनने सर्वाधिक 32 धावा केल्या. 


टीम इंडियाने नाणेफेक जिंकत पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने 50 षटकांत 7 बाद 229 अशी खेळी केली. यास्तिका भाटिया आणि शेफाली वर्मा तसेच ऋचा घोष यांच्या हॅमिल्टनमध्ये बांगलादेशविरुद्धच्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे भारताला चांगली धावसंख्या गाठता आली. प्रथम फलंदाजी करताना, मिताली राजने चांगली सुरुवात केली.


शैफाली आणि स्मृती मानधना यांनीही सुरुवातीला चांगली खेळी केली. मात्र, बांगलादेशने स्मृती मानधना, शैफाली वर्मा आणि मिताली राज यांच्या तीन झटपट विकेट घेत भारताला बॅकफूटवर आणले. पुढे भारताने हरमनप्रीत आणि ऋचा घोष यांना गमावले पण यस्तिका भाटियाने मैदानावर टिकून दमदार अर्धशतक ठोकून भारताला शेवटी चांगली धावसंख्या गाठण्यास मदत केली.


स्पर्धेतील भारताची स्थिती


बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर भारत उपांत्य फेरीकडे एक पाऊल पुढे पोहोचला आहे. टीम इंडियाला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर उरलेला एक सामनाही जिंकावा लागणार आहे. भारताने पुढील सामना जिंकल्यास टीम इंडिया उपांत्य फेरीत प्रवेश करेल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha