Women World Cup India Vs Bangladesh : महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशला विजयासाठी 230 धावांचे आव्हान दिले आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. भारतीय संघाची फलंदाज यास्तिका भाटियाने शानदार अर्धशतकी खेळी रचली. टीम इंडियाकडून तिने सर्वाधिक धावा केल्या.
टीम इंडियाने नाणेफेक जिंकत पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवर स्मृती मंधाना (30) आणि शेफाली वर्मा (42) यांनी 74 धावांची सलामी दिली. सलामीची जोडी फुटल्यानंतर टीम इंडियाला तीन धक्के बसले. कर्णधार मिताली राज भोपळाही न फोडता तंबूत परतली. मिताली बाद झाल्यानंतर यास्तिका भाटियाने टीम इंडियाचा डाव सावरला. तिने हरमनप्रीतसह (14 धावा) 34 धावांची आणि रिचा घोषसह (26 धावा) 54 धावांची भागिदारी रचत डावाला आकार दिला.
यास्तिका अर्धशतकी खेळी केल्यानंतर बाद झाली. तिच्यानंतर पूजा वस्त्रकार (30 धावा) आणि स्नेह राणा (27 धावा) यांनी 48 धावांची भागिदारी रचली आणि टीम इंडियाची धावसंख्या 229 पर्यंत नेली. बांगलादेशची गोलंदाज रितू मोनीने 3, नाहिदा अख्तरने 2 आणि जहानारा आलमने एक विकेट बाद केला.
मागील दोन सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत टीम इंडिया मागे पडली होती. आजचा सामना जिंकल्यास टीम इंडियाचे आव्हान जिवंत राहू शकते. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर, दक्षिण आफ्रिकेचाही प्रवेश निश्चित समजला जात आहे.
स्पर्धेतील जर-तरची स्थिती
टीम इंडियाने आपले शेवटचे दोन्ही सामने गमावले तर विश्वचषकातून बाहेर पडणे जवळपास निश्चित आहे. त्याचबरोबर दोन्ही सामने जिंकल्यास उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा आशा जिवंत राहू शकतात. टीम इंडियाने एक तरी सामना गमावल्यास इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार.