ICC T20 Rankings: भारताचा आयर्लंड दौरा संपल्यानंतर आयसीसीनं बुधवारी ताजी टी-20 क्रमवारीका जाहीर केली. भारतानं दुसऱ्या टी-20 सामन्यात आयर्लंडचा चार धावांनी पराभव करत मालिका 2-0 ने जिंकली. आयर्लंडविरुद्ध स्फोटक फलंदाजी करणाऱ्या भारताचा युवा फलंदाज दीपक हुडा (Deepak Hooda) आणि संजू सॅमसनला  (Sanju Samson) आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. आयसीसी क्रमवारीत दीपक हुडानं  414 स्थानांनी झेप घेत 104व्या स्थानी पोहचला आहे. 


भारतीय युवा खेळाडूंना फायदा
आयर्लंडविरुद्ध टी20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनला 57 स्थानांचा फायदा झाला असून तो आता 144 व्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या सामन्यात त्याने 77 धावा केल्या. गोलंदाजांच्या क्रमवारीत हर्षल पटेल 37 वरून 33 व्या स्थानावर पोहोचला आहे.भारताचा सलामीवीर इशान किशनची ताज्या क्रमवारीनुसार सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. आयर्लंड मालिकेचा भाग नसलेले केएल राहुलची 17 व्या तर, रोहित शर्माची 19 व्या स्थानी घसरण झालीय. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, जो दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन टी-20 मालिकेत खेळू शकला नाही, तो 21 व्या स्थानावर कायम आहे.



बाबर आझम अव्वल स्थानी कायम
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 818 गुणांसह टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. तर त्याचा सहकारी मोहम्मद रिझवान 794 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम 757 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक दिवस अव्वल स्थानी राहण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावावर नोंदवला गेलाय. या आधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. बाबरनं टी-20 फॉरमॅटमध्ये नंबर वन फलंदाज म्हणून 1028 दिवस घालवले आहेत. त्याच्यापाठोपाठ भारताचा विराट कोहली आणि इंग्लंडचा केविन पीटरसनचा क्रमांक लागतो. कोहलीनं 1 हजार 13 दिवस, तर पीटरसननं टी-20 क्रिकेटमध्ये 729 दिवस अव्वल स्थानी घालवले आहेत. 


हे देखील वाचा-