Ravindra Jadeja : बोटांना क्रिम लावणं रवींद्र जाडेजाला पडलं महाग, आयसीसीनं ठोठावला दंड, वाचा नेमकं कारण
IND vs AUS 1st Test: नागपुर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरु असताना रवींद्र जाडेजाने वेदना कमी करणारी क्रिम बोटांवर लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यावर ऑस्ट्रेलियन मीडियाने त्याच्यावर बॉल टेम्परिंगचा आरोपही केला होता.
IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 (Border Gavaskar Trophy) च्या पहिल्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याला आयसीसीकडून दंड ठोठावण्यात आला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी, रवींद्र जाडेजा गोलंदाजी करताना बोटांना क्रीम लावताना दिसला. आता त्याला हीच कृती महाग पडली आहे. आयसीसीकडून त्याची 25 टक्के मॅच फी कापण्यात आली आहे. जाडेजाने अंपायरच्या परवानगीशिवाय ही क्रीम लावल्यामुळे असं करण्यात आलं आहे. यासोबतच जाडेजाला डिमेरिट पॉईंटही देण्यात आला आहे.
या प्रकरणावर ICC ने एक निवेदन जारी केले आहे की त्या लिहिलं आहे की, 'रवींद्र जाडेजा ICC आचारसंहितेच्या कलम 2.20 चे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे, जे खेळाच्या भावनेच्या विरुद्ध आचरण प्रदर्शित करण्याशी संबंधित आहे. यासोबतच जाडेजाच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एका डिमेरिट पॉईंटचीही भर पडली आहे. 24 महिन्यांच्या कालावधीतील त्याचा हा पहिलाच गुन्हा आहे.'
🚨 JUST IN: India star handed penalty for ICC Code of Conduct charge during first Test against Australia!#WTC23 | #INDvAUS | Details 👇
— ICC (@ICC) February 11, 2023
नेमकं काय घडलं होतं?
नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी जाडेजाने बोटांना क्रीम लावल्याची ही घटना ऑस्ट्रेलियाच्या डावातील 46 व्या ओव्हरमध्ये घडली होती. जाडेजाने मोहम्मद सिराजच्या हातातून क्रीम काढून बोटांवर लावली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंपासून ते मीडिया आणि चाहत्यांनी साऱ्यांनीच जाडेजावर टीका केली होती. अशाप्रकारे त्याचा क्रीम लावण्याचा संबंध बॉल टेम्परिंगशी जोडला जात होता. यावर मॅच रेफरीनेही जाडेजाला प्रश्न विचारला होता, ज्याच्या उत्तरात भारतीय संघ व्यवस्थापनाकडून सांगितले होते की हे क्रीम बोटांवर वैद्यकीय कारणासाठी म्हणजेच वेदना कमी करण्यासाठी लावली होती. जाडेजाच्या उत्तराने पंचांचे समाधान झाले. यासोबतच बोटांवर क्रीम लावल्याने चेंडूच्या स्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचेही स्पष्ट झाले. पण पंचाची परवानगी घेतली नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
भारताची मालिकेत 1-0 ची आघाडी
नागपूर कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला अवघ्या 177 धावांत गुंडाळले, प्रत्युत्तरात भारतीय संघाने त्यांच्या डावात 400 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 91 धावांत आटोपला. अशा प्रकारे भारताने आता चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
हे देखील वाचा-