Australia Squad ICC Champions Trophy 2025 : रोहित सेनेसमोर पुन्हा पिवळ्या जर्सीचं आव्हान; वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या कांगारूंच्या संघात फक्त इतके बदल?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे उलटी गिनती सुरू झाली आहे.
Australia Squad ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे उलटी गिनती सुरू झाली आहे. ही स्पर्धा पुढील महिन्यात म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या आयसीसी स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होतील, त्यापैकी आतापर्यंत 5 संघांनी त्यांचे टीम जाहीर केले आहेत. ऑस्ट्रेलिया आपला संघ जाहीर करणारा पाचवा संघ ठरला. भारत आणि पाकिस्तान हे असे संघ आहेत, ज्यांनी अद्याप संघाची घोषणा केली नाही.
आयसीसीच्या नियमांनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या आठही देशांना स्पर्धा सुरू होण्याच्या पाच आठवडे आधी संघाची घोषणा करावी लागणार आहे, परंतु संघांना पहिल्या सामन्याच्या एक आठवड्यापूर्वीपर्यंत बदल करण्याची परवानगी असेल. त्यानंतर संघात कोणताही बदल करण्यासाठी आयसीसीची परवानगी आवश्यक असेल.
टीम इंडियाला बाळगावी लागणार सावधगिरी....
ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. संघाची कमान पुन्हा एकदा पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आली आहे. कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये भारतीय भूमीवर खेळलेला आयसीसी विश्वचषक जिंकला. त्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने यजमान संघ भारताचा पराभव केला आणि विश्वविजेता बनला. तेव्हापासून जवळजवळ 1 वर्ष आणि 2 महिने उलटून गेले आहेत. पण ऑस्ट्रेलियन संघात फारसे बदल झालेले नाहीत.
अशा परिस्थितीत टीम इंडियाला सावधगिरी बाळगावी लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आणि टीम ऑस्ट्रेलिया एकाच गटात नसले तरी, सेमीफायनल किंवा फायनलमध्ये दोन्ही संघ एकमेकांशी भिडण्याची चांगली शक्यता आहे. त्यामुळे, टीम इंडियाला सावधगिरी बाळगावी लागेल. कारण त्यांना जवळजवळ त्याच संघाचा सामना करावा लागेल जो 2023 च्या आयसीसी वर्ल्ड कपमध्ये होता.
2023 च्या वर्ल्ड कपमधील 15 पैकी 12 खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार?
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाने निवडलेला संघ जवळजवळ 2023 च्या वर्ल्ड कप संघासारखाच आहे. वर्ल्ड कपपासून ऑस्ट्रेलियन संघात फक्त 3 बदल झाले आहेत. डेव्हिड वॉर्नर 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळला होता, पण आता तो निवृत्त झाला आहे. त्याच्या जागी, मॅथ्यू शॉर्टला पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, दुखापतीमुळे कॅमेरून ग्रीन संघात नाही. त्याच्या जागी, आरोन हार्डीला आयसीसीच्या स्पर्धेत प्रथमच संघात संधी देण्यात आली आहे. शॉन अॅबॉट 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळला होता, पण यावेळी त्याला संघातून वगळण्यात आले आहे. आता अॅबॉटच्या जागी वेगवान गोलंदाज नॅथन एलिस खेळताना दिसेल. म्हणजेच, 2023 च्या वर्ल्ड कपमधील 15 खेळाडूंपैकी 12 खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील. फक्त 3 खेळाडू नवीन असतील.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स केरी, नॅथन एलिस, अॅरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, अॅडम झाम्पा.
हे ही वाचा -