(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाकिस्तान बीसीसीआयला भिडणार...चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 7 संघ निश्चित, टीम इंडियाच्या जागी श्रीलंकेला संधी?
ICC Champions Trophy 2025: बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.
ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) पुढील वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 7 संघ निश्चित झाले आहेत, परंतु आठव्या स्थानासाठी दोन्ही संघांमध्ये लढत आहे. वास्तविक, हे प्रकरण भारतीय क्रिकेट संघाशी संबंधित आहे, कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.
भारताने गेल्या वर्षीच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसीला पाठवलेल्या प्रस्तावित वेळापत्रकात भारताचे सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहेत. 2008 पासून टीम इंडिया पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळायला गेली नसल्यामुळे 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असेच घडण्याची शक्यता फार कमीच आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देखील हायब्रिड मॉडेलप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यास सहमत नाही. त्यामुळे आयसीसी यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
टीम इंडियाच्या जागी श्रीलंकेला संधी?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फक्त पाकिस्तानमध्येच आयोजित केली जाईल, अशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भूमिका स्पष्ट आहे. त्याचवेळी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोणत्याही हायब्रीड मॉडेलच्या बाजूने नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघ 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात गेला नाही, तर टीम इंडियाची जागी श्रीलंकेला संधी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका नवव्या क्रमांकावर होता. अव्वल-8 संघांपैकी कोणताही एक संघ बाहेर पडला, तर विश्वचषकातील गुणतालिकेच्या आधारे श्रीलंका चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यास पात्र ठरेल.
आशिया चषकासाठी बीसीसीआयने दिला होता नकार-
गेल्या वर्षी आशिया चषक 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. यावेळीही असेच काही घडण्याची अपेक्षा आहे.
भारत जुन्या भूमिकेवर ठाम-
भारतानं 2023 मध्ये झालेल्या आशिया कपच्या वेळी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळी भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी निमित्तानं भारत जुन्या भूमिकेवर ठाम आहे. भारतानं 2008 नंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळलेलं नाही. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतानं पाकिस्तानला जायचा निर्णय घेतल्यास तब्बल 16 वर्षानंतर भारतीय संघ पाकिस्तानला जाईल. भारतानं भूमिका काय ठेवल्यास हायब्रीड मॉडेलनुसार देखील सामने खेळवले जाऊ शकतात. भारतानं दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्याबाबत भूमिका घेतली आहे. पीसीबीनं भारताचे सामने लाहोरमध्ये प्रस्तावित केले होते. भारत आणि पाकिस्तान मॅच 1 मार्च 2025 रोजी प्रस्तावित करण्यात आली आहे.