'माझ्यात अजूनही बरंच क्रिकेट शिल्लक', सुरेश रैनाला संघात पुनरागमन करण्याचा विश्वास
सुरेश रैना दोन वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. पण रोहित शर्मासोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये रैनाने संघात पुनरागमन करण्याचा विश्वास व्यक्त केला.
!['माझ्यात अजूनही बरंच क्रिकेट शिल्लक', सुरेश रैनाला संघात पुनरागमन करण्याचा विश्वास I still have a lot of cricket left in me, Suresh Raina remains hopeful of making national comeback 'माझ्यात अजूनही बरंच क्रिकेट शिल्लक', सुरेश रैनाला संघात पुनरागमन करण्याचा विश्वास](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/13142651/Suresh-Raina_Rohit-Sharma.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मागील दोन वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने पुन्हा एकदा संघात पुनरागमन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. "माझ्यात अजूनही बरंच क्रिकेट शिल्लक आहे," असं सुरेश रैना म्हणाला. भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याच्यासोबत इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान सुरेश रैना बोलत होता.
या लाईव्ह चॅटमध्ये रोहित शर्मा म्हणाला की, "तुला बराच काळ खेळताना पाहिलं आहे. त्यामुळे मला कुठेतरी असं वाटतं की तू संघात परत यायला हवा. तुझ्याकडे अनुभव आणि क्षेत्ररक्षण तसंच गोलंदाजीचीही क्षमता आहे. पण जे आपल्या हातात आहे तेच आपण करु शकतो."
यावर सुरेश रैनाने संघात पुनरागमन करण्याचा विश्वास व्यक्त केला. "मला दुखापत झाली आणि त्यावर शस्त्रक्रिया झाली. परिणामी मी संघातील माझं स्थान गमावलं. निवड आपल्या हातात नाही, पण परफॉर्मन्स आहे." "मी कायमच माझा खेळ एन्जॉय केला आणि जेव्हा आपण लहान होतो, तेव्हा सीनिअर खेळाडूंनी कायमच पाठिंबा दिला. त्यामुळे पाठिंबा देण्यासाठी आणि मार्ग दाखवण्यासाठी कोणतरी हवं," असं सुरेश रैनाने म्हटलं.
33 वर्षीय सुरेश रैनाने 226 एकदिवसीय, 78 ट्वेण्टी20 आणि 18 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. इंग्लंडविरुद्ध जुलै 2018 मध्ये तो शेवटचा वनडे सामना खेळला होता. तेव्हापासून तो संघाबाहेरच आहे.
या लाईव्ह चॅटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापल्या आयपीएल संघांबद्दलचे अनुभवही शेअर केले. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स तर सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्ज संघातून खेळतो. रैनाने रोहित शर्माला सांगितलं की, "धोनीचा माझ्यावर अतिशय विश्वास होता. त्याने मला मधल्या फळीत खेळायला दिलं."
या लाईव्ह चॅटमध्ये दोन्ही खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघातील आपल्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. रोहित शर्मा म्हणाला की, "जेव्हा 2007 मध्ये मी संघात सामील झालो, त्यावेळी संघाचं वातावरण शाळेसारखं वाटलं होतं. संघात खूप सीनिअर खेळाडू होते. सुरुवातीला मला युवराज सिंहची भीती वाटायची. मी त्याच्या फारसा जवळ नसायचोय पण नंतर सगळं व्यवस्थित झालं. तो कायमच पाठिंबा द्यायचा."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)