Harbhajan Singh-Sreesanth Video : 'वाटली पाहिजे मोदी अन्...' कानाखाली मारण्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रीसंतची पत्नी संतापली
Harbhajan Singh Slapping Sreesanth Video : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात मोठ्या वादांपैकी एक ठरलेला ‘थप्पड कांड’चा व्हिडिओ अखेर पहिल्यांदाच जगासमोर आला आहे.

Harbhajan Singh Slapping Sreesanth Video : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात मोठ्या वादांपैकी एक ठरलेला ‘थप्पड कांड’चा व्हिडिओ अखेर पहिल्यांदाच जगासमोर आला आहे. 2008 साली आयपीएलच्या पहिल्याच हंगमात दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने टीम इंडियाच्या आपल्या ज्युनिअर सहकाऱ्याला, वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला सामन्यानंतर कानाखाली लगावली होती. त्या घटनेने संपूर्ण क्रिकेटविश्वाला धक्का बसला होता. मात्र इतकी वर्षे या घटनेचा प्रत्यक्ष व्हिडिओ कुणीच पाहिला नव्हता. तब्बल 17 वर्षांनंतर हा व्हिडिओ बाहेर आला असून पुन्हा एकदा विषय पेटला आहे. आयपीएलला जगासमोर आणणारे ललित मोदी यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यामुळे श्रीसंतची पत्नी चांगलीच भडकली आणि तिने मोदीवर सडकून टीका केली.
ललित मोदीने लीक केला व्हिडिओ
मागील 17 वर्षांमध्ये या घटनेचा व्हिडिओ कुणाच्याच डोळ्यांसमोर आला नव्हता. पण अखेर ललित मोदींनी तो लीक केला. आयपीएलचे पहिले आयुक्त असलेल्या मोदींनी माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कच्या पॉडकास्टमध्ये त्या घटनेचा उल्लेख करतानाच हा व्हिडिओही दाखवला. मोदींनी उघड केले की सामन्यानंतर ती घटना घडली, तेव्हा ब्रॉडकास्टिंगचे सर्व कॅमेरे बंद झाले होते. मात्र स्टेडियममधील सुरक्षा कॅमेरा सुरु होता आणि त्यात संपूर्ण प्रकार रेकॉर्ड झाला. मोदींनी तो फुटेज आपल्या जवळ जपून ठेवला होता आणि इतकी वर्षे कुणालाही दाखवला नव्हता.
One of the wildest moments in IPL history, Unseen footage of the Bhajji–Sreesanth slapgate that never been aired#IPL pic.twitter.com/E9Ux8bodOW
— Vishal (@Fanpointofviews) August 29, 2025
व्हिडिओवरून संतापल्या श्रीसंतच्या पत्नी
मोदींनी हा व्हिडिओ क्लार्कला दिला आणि क्लार्कने तो आपल्या पॉडकास्टवर शेअर केला. जसजसा हा व्हिडिओ बाहेर आला, तसतसा पुन्हा एकदा त्या जुन्या घटनेची चर्चा रंगली. सोशल मीडियावरही तो जोरात व्हायरल झाला. मात्र या प्रकारामुळे श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी चांगलीच संतापली. तिने सोशल मीडियावरून मोदी आणि क्लार्कवर टीका केली.
भुवनेश्वरी हिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, “लाज वाटली पाहिजे ललित मोदी आणि मायकेल क्लार्क यांना. तुम्ही माणूसच नाही, जे फक्त स्वतःच्या स्वस्त प्रसिद्धीसाठी आणि व्ह्यूजसाठी 2008 च्या जुन्या जखमा कुरवाळत आहात. श्रीसंत आणि हरभजन दोघेही त्या घटनेपलीकडे बरेच पुढे निघून गेले आहेत. आज ते वडील आहेत, ज्यांची मुलं शाळेत जातात. तरीही तुम्ही त्यांचे जुने जखम पुन्हा उघडत आहात. हे कृत्य अत्यंत लज्जास्पद आहे.”
मोदी-क्लार्कवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
भुवनेश्वरी हिने संपूर्ण प्रकरणात पती श्रीसंतचा पाठिंबा दर्शवला. तिने सांगितले की, श्रीसंतने आपल्या आयुष्यात आलेल्या असंख्य संकटांना सामोरं जाऊन त्यातून बाहेर पडत पुन्हा उभारी घेतली आहे. पण 17 वर्षांपूर्वीच्या जखमा पुन्हा उघडून कुटुंबांना पुन्हा त्या वेदनादायी प्रसंगातून जावं लागणं अमानवीय आहे. त्यामुळे असा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याबद्दल मायकेल क्लार्क आणि ललित मोदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली.





















