Gautam Gambhir : हर्षित राणाची ट्रोलिंग, गौतम गंभीर अश्विनवर भडकला! म्हणाला, यूट्यूब चालवण्यासाठी नको ते उद्योग करु नको!
Gautam Gambhir on Harshit Rana : दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने वेस्टइंडिजवर 7 गडी राखून शानदार विजय मिळवला.

Gautam Gambhir on Harshit Rana : दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने वेस्टइंडिजवर (Team India beat West Indies 2nd Delhi Test) 7 गडी राखून शानदार विजय मिळवला. याआधी अहमदाबादमध्ये खेळलेली पहिली कसोटी भारताने डाव आणि 140 धावांनी जिंकली होती. ज्यामुळे टीम इंडियाने 2-0 ने मालिका जिंकली. दिल्लीत मिळालेला हा विजय आणि मालिकेतील क्लीन स्वीप भारतासाठी अनेक अर्थांनी खास ठरला आहे. ही शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली भारताची पहिली कसोटी मालिका विजय ठरली, तसेच या विजयातून टीम इंडियाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला (India head Coach Gautam Gambhir) त्याच्या वाढदिवसाची भेट दिली. कारण गंभीरला मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली कसोटी मालिका जिंकण्यासाठी तब्बल एका वर्षाची प्रतीक्षा करावी लागली. वेस्टइंडिजचा सुपडा साफ केल्यानंतर तो पत्रकार परिषदेसाठी आला, मात्र तिथे एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर गंभीर अक्षरशः भडकला.
हर्षित राणाला वारंवार टीम इंडियात स्थान दिल्याने नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग
मंगळवारी वेस्टइंडिजविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. गंभीर हा टीम इंडियाचे प्रशिक्षक झाल्यापासून त्याच्यावर असा आरोप होत आहे की, तो राणाला विशेष कामगिरी नसतानाही सतत संघात संधी देत आहेत. जेव्हा गौतम गंभीर विचारण्यात आलं की, “हर्षित राणाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? तेव्हा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अक्षरशः संतापले.
हर्षित राणावर गौतम गंभीर काय म्हणाला? (Gautam Gambhir on Harshit Rana)
गौतम गंभीर म्हणाला की, “हे थोडं लाजिरवाणं आहे की तुम्ही 23 वर्षांच्या एका तरुण खेळाडूला टार्गेट करत आहे. हर्षितचा वडील कुठल्यातरी बोर्डाचा माजी चेअरमन नाही. त्यामुळे एका व्यक्तीवर अशा प्रकारे बोट ठेवणं योग्य नाही. हर्षितला सोशल मीडियावर ट्रोल करणं मुळीच बरोबर नाही. त्याच्यावर याचा मानसिक परिणाम होऊ शकतो, याचा विचार करा. कोणाचंही पोरं क्रिकेट खेळतंय, यासाठी त्याला टार्गेट करणं मान्य नाही. फक्त स्वतःचं यूट्यूब चॅनल चालवण्यासाठी काहीही बोलणं टाळा.”
GAMBHIR ABOUT TROLLING HARSHIT RANA:
— Johns. (@CricCrazyJohns) October 14, 2025
"It’s a little shameful that you are targeting a 23 year old personally - Harshit’s father is not an ex chairman. It is not fair that you target an individual. Social media trolling is just not right & imagine the mindset. Anyone’s kid will… pic.twitter.com/EcKIyCWkMU
हेही लक्षात घेण्यासारखं आहे की ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे आणि टी20 मालिकेसाठी हर्षित राणाची पुन्हा टीम इंडियात निवड झाली आहे. यावरून सोशल मीडियावर चाहते गंभीर आणि निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत हर्षितची कामगिरी काही खास नव्हती. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि माजी निवडप्रमुख के. एस. श्रीकांत यांनीदेखील हर्षितच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला होता. आता गौतम गंभीर यांनी नाव न घेता त्यांनाही अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
रोहित–कोहलीवरही गंभीरची मोठी प्रतिक्रिया
19 ऑक्टोबरपासून भारत ऑस्ट्रेलियात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत सर्वांचं लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे असेल. मोठा प्रश्न असा आहे की, संघ व्यवस्थापन या दोघांना 2027 च्या विश्वचषकाच्या योजनांमध्ये समाविष्ट ठेवणार आहे का नाही. या प्रश्नावर गौतम गंभीर म्हणाला की, “वनडे विश्वचषक अजून सुमारे अडीच वर्षं दूर आहे. सध्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. रोहित आणि विराट दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत. मला खात्री आहे की त्यांचा हा दौरा यशस्वी ठरेल.”
















