Points Table: न्यूझीलंड-बांगलादेशच्या पराभवानंतर इंग्लंड दहाव्या स्थानी, पाहा कोणत्या संघाची काय स्थिती?
World Cup 2023 Points Table Update : विश्वचषकात शनिवारी झालेल्या दोन सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झालाय.
World Cup 2023 Points Table Update : विश्वचषकात शनिवारी झालेल्या दोन सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झालाय. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केलाय तर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सने बांगलादेशविरोधात सनसनाटी विजय मिळवला. या दोन सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झालाय. गतविजेता इंग्लंडचा संघ दहाव्या स्थानी घसरलाय. तर नेदरलँड्सचा संघ आठव्या क्रमांकावर पोहचलाय. बांगलादेश नवव्या स्थानी आहे.
टॉप 4 ची स्थिती काय ?
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेनं टॉप-4 मध्ये बदल करत अव्वल स्थान गाठलं होतं. टीम इंडिया दुसऱ्या तर न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतरही ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर कायम आहे. टीम इंडियानं पुढचा इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकल्यास पुन्हा एकदा अव्वल स्थानावर येऊ शकते. आतापर्यंत, टीम इंडिया हा एकमेव संघ आहे, ज्यानं एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचे समान गुण आहेत, पण न्यूझीलंड सरस रनरेटमुळे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
इतर संघाची स्थिती काय ?
श्रीलंका निगेटिव्ह -0.205 च्या नेट रनरेटसह 4 गुण मिळवत पाचव्या, पाकिस्तान निगेटिव्ह -0.387 च्या नेट रनरेटसह 4 गुण मिळवत सहाव्या, अफगाणिस्तान निगेटिव्ह -0.969 च्या नेट रनरेटसह 4 गुण मिळवत सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. बांगलादेश निगेटिव्ह -1.338 च्या नेट रनरेटसह 2 गुण मिळवत नवव्या, इंग्लंड निगेटिव्ह -1.634 च्या नेट रनरेटसह 2 गुण मिळवत दहाव्या क्रमांकावर आहे.
नेदरलँड्सचा बांगलादेशवर विजय -
नेदरलँड्सने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. सलामी फलंदाज लिटन दास अवघ्या तीन धावांवर तंबूत परतला. तंजीद हसन याने 16 चेंडूत 15 धावांचे योगदान दिले. मेहदी हसन मिराज यालाही मोठी खेळी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर तो 35 धावांवर बाद जाला. नेदरलँड्सच्या संघाने बांगलादेशच्या संघाला कधीच वरचढ होऊ दिले नाही. ठरावीक अंतराने बांगलादेशच्या फलंदाजांना तंबूत धाडले. कर्णधार शाकीब अल हसन याला फक्त पाच धावाच करता आल्या. मुशफिकुर रहीम फक्त एक धाव काढून बाद झाला. मेहदी हसन यालाही फक्त 17 धावांचे योगदान देता आले. त्याने 38 चेंडूचा सामना केला. अखेरीस मुस्तफिजुर रहमान याने 35 चेंडूत 20 धावा जोडल्या तर तस्कीन अहमद याने 11 धावा केल्या. बांगलादेशचा संपूर्ण संघ 42.2 षटकात 142 धावांत बाद झाला.
ऑस्ट्रेलियाचा अवघ्या पाच धावांनी विजय -
धर्मशालातल्या विश्वचषक साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 389 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा न्यूझीलंडचा थरारक प्रयत्न पाच धावांनी अयशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला 383 धावांत रोखून सनसनाटी विजय साजरा केला. ऑस्ट्रेलियाचा हा सहा सामन्यांमधला चौथा विजय ठरला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात ट्रॅव्हिस हेडचं शतक आणि त्यानं डेव्हिड वॉर्नरसोबत दिलेली 175 धावांची सलामी मोलाची ठरली. त्यानंतर रचिन रवींद्रनं झळकावलेलं शतक आणि डॅरिल मिचेलनं त्याला दिलेल्या अर्धशतकी साथीच्या जोरावर न्यूझीलंडनं आपल्या डावाचा भक्कम पाया घातला. त्यानंतर जेम्स नीशामनं 39 चेंडूंत 58 धावांची झंझावाती खेळी करून न्यूझीलंडला विजयासमीप नेलं. पण तो रनआऊट झाला आणि शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार ठोकण्याचं आव्हान तळाच्या लॉकी फर्ग्युसनला पेलवलं नाही. त्यामुळं ऑस्ट्रेलियानं हा सामना जिंकून विश्वचषकाच्या साखळी चौथा विजय साजरा केला.