Chris Woakes: ॲशेस मालिकेसाठी संघातून वगळलं, ख्रिस वोक्सचा 15 वर्षाच्या क्रिकेट करिअरला रामराम, निवृत्ती जाहीर
Chris Woakes: इंग्लंडचा ऑलराऊंडर ख्रिस वोक्स यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होत असल्याचं त्यानं जाहीर केलंय.

Chris Woakes लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचव्या दिवशी हाताला फ्रॅक्चर झालेलं असून देखील हाताला बँडेज असूनही एका हातात बॅट घेऊन मैदानात उतरलेला ख्रिस वोक्स आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापुढं खेळताना दिसणार नाही. इंग्लंडचा ऑलराऊंडर आणि वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सनं (Chris Woakes) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं ख्रिस वोक्सच्या निवृत्तीबाबत पोस्ट केली आहे.
Chirs Woakes Retirement : ख्रिस वोक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲशेस स्पर्धेत संघात स्थान न मिळाल्यानं 36 वर्षीय क्रिकेटपटू ख्रिस वोक्सनं निवृत्ती जाहीर केली आहे. ख्रिस वोक्सच्या निवृत्तीवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं ख्रिस वोक्सला निवृत्तीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय ख्रिस वोक्सनं देखील सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. वोक्सनं ईसीबीचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी काऊंटी क्रिकेट आणि फ्रँचायजी क्रिकेट येत्या वर्षांमध्ये खेळत राहणार असल्याचं ख्रिस वोक्सनं म्हटलंय.
ख्रिस वोक्सनं त्याच्या करिअरमध्ये 62 कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय त्यानं ख्रिस वोक्सनं इंग्लंडसाठी 122 वनडे सामने खेळले आहेत. तर, 33 टी 20 सामने देखील ख्रिस वोक्सनं खेळले आहेत.
विश्वविजेत्या संघाचा सदस्य
इंग्लंडनं 2019 चा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कप विजेत्या संघात ख्रिस वोक्स होता.याशिवाय 2022 च्या टी वर्ल्ड कप विजेत्या संघात देखील ख्रिस वोक्स होता. ख्रिस वोक्सनं 2011 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पण केलं होतं. ख्रिस वोक्सनं कसोटीमध्ये 192 विकेट घेतल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ख्रिस वोक्सच्या नावावर 200 विकेट आहेत. वोक्सनं त्याच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत एक शतक केलं आहे. ते शतक लॉर्डसवर भारताविरोधात केलं होतं.
दुखापतग्रस्त असूनही मैदानावर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका दोन महिन्यापूर्वी पार पडली. ओव्हल कसोटीत ख्रिस वोक्स दुखापतग्रस्त झाला होता. ओव्हल कसोटीच्या पहिल्याच दिवशी ख्रिस वोक्स दुखापतग्रस्त झाला होता. मात्र, इंग्लंडला पराभवापासून वाचवण्यासाठी ख्रिस वोक्स एक हात बँडेजनं बांधलेला असला तरी एका हातात बॅट घेऊन मैदानावर दाखल झाला होता. त्या मॅचमध्ये त्याला फलंदाजी करावी लागली नाही. मात्र, खेळाप्रती असलेली ख्रिस वोक्सची बांधिलकी सर्वांना पाहायला मिळाली होती. त्याचं सर्वत्र कौतुक झालं होतं. दरम्यान, आता 21 नोव्हेंबरपासून होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲशेस स्पर्धेत ख्रिस वोक्स इंग्लंडच्या संघात नसेल.
Pleasure has been all mine. No regrets 🏴 pic.twitter.com/kzUKsnNehy
— Chris Woakes (@chriswoakes) September 29, 2025



















