Gautam Gambhir Ind vs Ban: दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशविरुद्ध 280 धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. बांगलादेशसमोर 515 धावांचे मोठे लक्ष्य होते, पण धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 234 धावांवर गारद झाला. गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारताचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर कसोटी सामन्यातील भारताचा हा पहिला विजय आहे. या विजयावर प्रशिक्षक गौतम गंभीरने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने काय म्हणाला?
गौतम गंभीरने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचा फोटो शेअर केला आहे. यासोबत गौतम गंभीरने कॅप्शनमध्ये लिहिले की, "एक शानदार सुरुवात. संघ खूप चांगला खेळला." दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पुढील आव्हानांसाठी मजबूत संघ तयार करण्यावर भर दिला आहे.
गौतम गंभीरपुढे खडतर आव्हान-
श्रीलंका दौऱ्यात गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती. श्रीलंकेच्या या दौऱ्यात भारतीय संघाने टी-20 मालिकेत विजय मिळवला होता. पण एकदिवसीय मालिकेत भारताला पराभवाचा सामना करायला लागला. आता बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर न्यूझीलंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील खडतर आव्हानही गंभीरसमोर असेल. या सर्व मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहे.
विजयानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, आम्हाला एक संघ तयार करायचा आहे ज्यात गोलंदाजीचे सर्वोत्तम पर्याय आहेत. आम्हाला सर्व प्रकारच्या हवामान आणि परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल. आम्ही भारतात खेळू किंवा परदेशी भूमीवर, आमच्या टीमला त्यानुसार तयार करावे लागेल, असं रोहित शर्माने सांगितले.
अश्विनला खेळापासून दूर ठेवू शकत नाही...
लाल मातीची विकेट गोलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त असते. पण जर तुम्ही फलंदाज असाल तर तुम्हाला संयम दाखवावा लागेल. या खेळपट्टीवर आमच्या खेळाडूंनी खूप संयम दाखवला. दबावात आमचे खेळाडू चांगले खेळले. विशेषत: रविचंद्रन अश्विनची फलंदाजी कौतुकास्पद आहे. गोलंदाजीशिवाय रवी अश्विनने फलंदाजीतही आम्हाला योगदान दिले आहे. हे त्याने याआधी देखील अनेकदा केले आहे. तुम्ही अश्विनला या खेळापासून दूर ठेवू शकत नाही, असं रोहित शर्माने सांगितले.
संबंधित बातमी:
वडिलांना पोराचं कौतुक, रोहित-विराटची मिठी; बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर सगळेच भावूक, Photo
WTC च्या फायनलसाठी टीम इंडियाचा दावा मजबूत; पहिलं स्थान कायम, पुन्हा ऑस्ट्रेलिया नशिबी येणार?