Bhuvneshwar Kumar 2027 World Cup : 2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
Bhuvneshwar Kumar on playing in 2027 World Cup : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या चर्चेत आहे.

Bhuvneshwar Kumar on playing in 2027 World Cup : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या चर्चेत आहे. 2022 मध्ये भारताकडून अखेरचा वनडे सामना खेळलेल्या भुवीने 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याच्या शक्यतेवर मोठं वक्तव्य केलं आहे. भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधण्यापेक्षा सध्या क्रिकेट खेळत राहणं आणि चांगली कामगिरी करणं हेच आपलं लक्ष्य असल्याचं त्याने स्पष्ट केलं.
2027 वर्ल्ड कपसाठी कमबॅक करणार?
आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये नुकत्याच केलेल्या कामगिरीच्या जोरावर 2027 वनडे वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न भुवनेश्वर कुमारला विचारण्यात आला. यावर त्याने अत्यंत संयमी उत्तर दिलं. “मला खेळायचं आहे आणि मी खेळत आहे. त्यानंतर काय होईल, याचा अंदाज मी लावू शकत नाही,” असं भुवनेश्वरने सांगितलं. भुवीच्या या वक्तव्यामुळे 2027 च्या वर्ल्ड कपसाठी त्याच्या कमबॅकच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. एकीकडे तो भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी मैदानावर आपली कामगिरी सिद्ध करत आहे, तर दुसरीकडे निवड समिती त्याच्याकडे पुन्हा एकदा लक्ष देणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
RCB ला दोनदा आयपीएल चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका
भुवनेश्वर कुमार हा भारताच्या अनुभवी स्विंग गोलंदाजांपैकी एक आहे. आयपीएलमध्येही त्याने सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा आगामी देशांतर्गत आणि टी20 स्पर्धांमध्येही होणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश टी20 लीगच्या चौथ्या हंगामाला 14 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भुवनेश्वर कुमार लखनऊ फाल्कन्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे. यूपी टी20 लीगच्या चौथ्या हंगामात 24 दिवसांत एकूण 34 सामने खेळवले जाणार आहेत. यंदा प्रथमच ही स्पर्धा दोन शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर सुरुवातीच्या टप्प्यात 13 दिवसांत 22 सामने होतील. त्यानंतर स्पर्धा कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियममध्ये दाखल होईल आणि उर्वरित 12 सामने 11 दिवसांत खेळवले जातील.
“दरवर्षी लीगमध्ये सुधारणा होत आहे”
भुवनेश्वर कुमार यूपी टी-20 लीगच्या पहिल्या हंगामापासून या स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे लीगचा प्रवास त्याने जवळून पाहिला आहे. या स्पर्धेमुळे उत्तर प्रदेशातील युवा खेळाडूंना मोठी संधी मिळत असल्याचं त्याचं मत आहे. भुवनेश्वर म्हणाला, “ही लीग सुरू होण्याचं चौथं वर्ष आहे. प्रत्येक वर्षी आम्हाला सुधारणा पाहायला मिळत आहे. मग ते खेळाडूंची क्षमता असो, यूपीसीएकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा असोत किंवा काम करण्याची पद्धत असो. मला खात्री आहे की या लीगचं भविष्य चांगलं आहे.”
“मला वाटतं प्रत्येक राज्यात अशा लीग होत आहेत. ही केवळ यूपीसीएपुरती मर्यादित नाही. आयपीएल आणि त्यानंतर राष्ट्रीय संघात स्थान मिळवू इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी अशा लीग महत्त्वाची पायरी ठरू शकतात,” असंही भुवीने सांगितलं. आता यूपी टी20 लीगमध्ये भुवनेश्वरच्या नेतृत्वाखाली लखनऊ फाल्कन्सची कामगिरी कशी होते आणि स्वतः भुवी आपल्या गोलंदाजीने किती प्रभाव पाडतो, याकडे सर्वांचं लक्ष असेल. त्यानंतर 2027 वर्ल्ड कपसाठी त्याच्या नावाचा विचार होतो का, हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे ही वाचा -




















