IPL 2023 पूर्वीच दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजाचा पाकिस्तानमध्ये धुमाकूळ, 12 चौकार अन् 8 षटकार मारत पूर्ण केलं शतक
Rilee Rossouw : IPL 2023 पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज Rilee Rossouw ने पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्फोटक फलंदाजी करत शुक्रवारी पेशावरविरुद्ध 121 धावांची शतकी खेळी खेळली.
PSL 2023 : पाकिस्तान सुपर लीग (PSL 2023) स्पर्धेचा 27 वा सामना 10 मार्च रोजी पेशावर झल्मी आणि मुलतान सुलतान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुलतानच्या संघाने पेशावरचा 4 गडी राखून पराभव केला. दरम्यान पेशावर झल्मीने पहिल्या डावात 4 बाद 242 धावा केल्या. मुलतान सुलतानने दिलेले 243 धावांचे लक्ष्य 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण देखील केले. दरम्यान मुलतान सुलतानच्या या सामन्यात विजयाचा हिरो होता रिले रुसो (Rilee Rossouw). त्याने 51 चेंडूत 12 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 121 धावांची तडाखेबाज खेळी केली. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्याकडून रिले रुसो अॅक्शनमध्ये दिसणार आहे. अशा परिस्थितीत, इंडियन प्रीमियर लीगच्या अगदी आधीच रुसोच्या बॅटने ही स्फोटक खेळी केल्याने दिल्ली कॅपिटल्सचा संघ सुखावला आहे.
रिले रुसोने बॅटने घातला धुमाकूळ
प्रथम फलंदाजी करताना पेशावर झल्मीने मुलतान सुलतान्सला 243 धावांचे मोठे लक्ष्य दिले. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुलतान सुलतान्सची सुरुवात चांगली झाली नाही आणि 28 धावांवर संघाच्या दोन विकेट पडल्या. मात्र यानंतर सामन्यात मोठं वळण आलं आणि रुसो नावाचं वादळ पाहायला मिळालं. दोन विकेट पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा हा फलंदाज रिले रुसोने बॅटने धुमाकूळ घातला.
रावळपिंडीच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये त्याने सर्वबाजूस शॉट्स खेळले. पेशावर झल्मीचा एकही गोलंदाज रुसोला अडचण निर्माण करु शकला नाही. दुसरीकडे रुसोने सर्व गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. या सामन्यात रुसोने 51 चेंडूत 12 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 121 धावांची दमदार आणि स्फोटक खेळी खेळली. रुसोच्या खेळीच्या जोरावर मुलतान सुल्तान्सने हा सामना 19.1 षटकांत जिंकला. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा हा फलंदाज पीएसएलनंतर भारतात आयपीएलमध्ये धमाल करताना दिसणार आहे. आयपीएल 2023 साठी झालेल्या मिनी लिलावात, दिल्लीने 4.60 कोटी रुपयांची मोठी बोली लावून रूसोचा त्यांच्या संघात समावेश केला.
पोलार्डनंही घेतला अप्रतिम झेल
याच सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे, मुलतान सुलतानला डावाच्या शेवटच्या षटकात 30 यार्डच्या आत 5 खेळाडू ठेवावे लागले. या षटकाबद्दल बोलायचं झालं तर, अन्वर अलीने पहिला चेंडू वाइड टाकला, तर पुढच्या चेंडूवर टॉम कोल्हेर कॅडमोरने षटकार ठोकला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार तर तिसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार लागला. आपल्या षटकातील चौथ्या चेंडूवर अन्वर अलीने पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि एकवेळ सर्वांना वाटले की चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल, पण कायरन पोलार्डने शानदार क्षेत्ररक्षण करताना पहिला चेंडू सीमारेषेच्या आत टाकला. नंतर त्याचे कॅचमध्ये रूपांतर केले.
हे देखील वाचा-