BCCI Sacks National Selection Committee: ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-ट्वेन्टी विश्वचषकातील उपांत्य फेरीतल्या टीम इंडियाच्या पराभवाचा फटका भारतीय सीनीयर निवड समितीला बसलाय. निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासह सर्व निवड समिती सदस्यांना बरखास्त करण्यात आलंय आणि या पराभवानंतर बीसीसीआयने पाचही जागांसाठी अर्ज मागवलेत. टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड अशा तीन तगड्या संघांशी मुकाबला करावा लागला होता. यापैकी पाकिस्तानची लढत कशीबशी जिंकली होती. तर, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडकडून त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या कामगिरीकरता सदोष संघनिवड जबाबदार असल्याचा सूर उमटला आणि त्याकरता निवड समितीला जबाबदार धरत बीसीसीआयकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचं बोललं जातंय. दरम्यान, नवीन नियुक्ती होईपर्यंत शर्मा यांची निवड समितीच काम पाहणार आहे. येणाऱ्या तीन वर्षात दोन विश्वचषक स्पर्धा आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अशा महत्त्वाच्या स्पर्धा पार पडणार आहेत. त्यामुळे या स्पर्धांसाठी संघ निवडीच्या वेळी निवड समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.


बीसीसीआयने ट्वीट करत निवड समितीच्या पाच जागांसाठी अर्ज मागवल्याची माहिती दिली आहे.  अर्ज करण्याची  अखेरची तारीख 28 नोव्हेंबर 2022 इतकी आहे. 






 
कोण करु शकतो अर्ज?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनं कमीतकमी सात आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेले असावेत. अथवा 30 प्रथम श्रेणीचे सामने खेळले असावेत. किंवा 10 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि 20 प्रथम श्रेणीचे सामने खेळले असावेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारानं पाच वर्षांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असावी. 
 






पराभवाचं खापर निवड समितीवर?
ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकात भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपले होते. उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा दहा विकेटने पराभव केला होता. त्याशिवाय आशिया चषकात भारताला फायनलपर्यंत धडक मारता आली नव्हती. विश्वचषकातील भारतीय संघाच्या निवडीवर अनेकांनी टीका केली होती. विश्वचषकातील पराभव जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच शुक्रवारी रात्री  बीसीसीआयने निवड समितीच्या रिक्त जांगासह सर्वच जागांसाठी अर्ज मागवले आहेत. 


24 डिसेंबर 2020 रोजी बीसीसीआयने चेतन शर्मा यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड केली होती. शर्मा यांच्यासह ॲबी कुरुविला आणि देबाशीष मोहंती यांचाही निवड समितीत समावेश करण्यात आला होता.  सुनील जोशी आणि हरविंदरसिंग निवड यांना समितीत कायम ठेवण्यात आले  होते. पण आता बीसीसीआयने एकाही सदस्याला कायम न ठेवता सर्वच जागांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीचं खापर निवड समितीवर फोडल्याची चर्चा आहे. काही क्रीडा तज्ज्ञांच्या मते, दोन वर्षांमध्ये आयसीसीच्या मोठ्या तीन स्पर्धा होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने हा मोठा विचार केलाय आहे. 


आणखी वाचा :
FIFA WC 2022: सर्वाधिक वेळा उपविजेता ठरलाय जर्मनीचा संघ, एका सामन्यात हंगेरीचे 10 गोल; फुटबॉल विश्वचषकातील खास पराक्रम