Hardik Pandya Team India Captain : टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला. ज्यानंतर आता टी20 संघात बदलांची मागणी होत आहे. अशामध्ये माजी क्रिकेटर आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी देखील हार्दिकला टी20 संघाचा कर्णधार करण्याची मागणी केली आहे. हे बोलताना त्यांना महान क्रिकेटर आणि विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचं उदाहरण दिलं आहे.


शास्त्री म्हणाले की, हार्दिकमध्येही आक्रमकता आणि सातत्य असेल तर ते संघातील इतर खेळाडूंमध्येही पाहायला मिळेल. मला आठवतंय असंच होतं जेव्हा कपिल देव संघाचा कर्णधार होता. जेव्हा तुमच्याकडे प्रभावशाली अष्टपैलू खेळाडू असतो आणि संपूर्ण 20 ओव्हर तो एनर्जेटीक खेळ करु शकतो तेव्हा खूप फरक पडतो. इतर खेळाडूंचीही प्रेरणा वाढते आणि त्यांनाही तशीच कामगिरी करायची असते. हार्दिक संघाचे नेतृत्व कसे करेल हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे." 


लवकरच हार्दिकच्या नावावर लागू शकतो शिक्कामोर्तब


शास्त्री सतत हार्दिकची शिफारस करत असून इतरही माजी क्रिकेटर्सनी त्याच नाव पुढे आणलं आहे, विशेष म्हणजे बीसीसीआयनेही यासाठी मन तयार केल्याचं दिसत आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये  असा दावा करण्यात आला आहे की बोर्ड लवकरच हार्दिकला नवीन टी-20 कर्णधार म्हणून घोषित करू शकते. रोहित शर्माचे वाढते वय आणि तिन्ही फॉरमॅटची जबाबदारी पाहता हा बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूझीलंड दौरा संपल्यानंतर भारताला श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे आणि या मालिकेपूर्वीच हार्दिकला कायमस्वरूपी कर्णधारपद मिळू शकते.


वीवीएस लक्ष्णणंही केलं होतं पांड्याचं कौैतुक


यापूर्वी लक्ष्मणनं हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचे अनेक फायदे सांगितले आहेत. तो म्हणाला होता, 'हार्दिक पांड्या एक उत्कृष्ट कर्णधार आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामात आपण पाहिलं की,त्यानं कशाप्रकारे गुजरातच्या संघाला विजय मिळवून दिला. आयर्लंड दौऱ्यातही मी त्याच्यासोबत खूप वेळ घातलाय. तो रणनीती बनवण्यात खूप चांगला आहे. यासोबतच तो मैदानावरही खूप शांत राहतो. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असता तेव्हा ते खूप महत्त्वाचं ठरतं. कारण कधी-कधी अशी परिस्थिती येते की, तुम्हाला एक लीडर म्हणून शांत राहाणं गरजेचं असतं. ड्रेसिंग रूममध्ये त्याची उपस्थिती आणि खेळाबद्दलची आवड अनुकरणीय आहे. तो ज्या पद्धतीनं मैदानात संघाचं नेतृत्व करतो, ते आश्चर्यकारक आहे. तो खेळाडूंचा कर्णधार आहे,मनमिळावू आहे. सहकारी खेळाडूंचा त्याच्यावर विश्वास आहे आणि याच गोष्टींमुळे मला तो कर्णधार म्हणून आवडतो", असं लक्ष्मणनं म्हटलंय.