Justin Langer Interested In Indian Head Coach: होय, मी खूप उत्सुक...; राहुल द्रविडची जागा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज घेणार?, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी जोरदार चर्चा
Justin Langer Interested In Indian Head Coach: राहुल द्रविडनंतर टीम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळू शकतो, त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Justin Langer Interested In Indian Head Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. भारतीय पुरुष वरिष्ठ संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आहेत, ज्यांचा कार्यकाळ जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर संपेल. राहुल द्रविडनंतर टीम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळू शकतो, त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
बीसीसीआयने सोमवारी (13 मे) रात्री उशिरा मुख्य प्रशिक्षक पदाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. उमेदवार सोमवार, 27 मे रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या पदासाठी अर्ज करू शकतील. प्रशिक्षकांसाठी निवड प्रक्रिया अर्जांच्या पुनरावलोकनाद्वारे होईल, त्यानंतर वैयक्तिक मुलाखत आणि निवडलेल्या उमेदवारांचे मूल्यमापन होईल. ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि लखनौ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर द्रविडची जागा घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. (Justin Langer Interested In Indian Head Coach)
जस्टींग लँगर काय म्हणाले?
जस्टींग लँगर म्हणाले की, भारतीय संघाचे प्रशिक्षक बनणे ही काही सामान्य गोष्ट नाही. लँगरला विचारण्यात आले की तो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज करणार का? यावर उत्तर देताना तो म्हणाला, "होय, मी खूप उत्सुक आहे. मी याबद्दल कधीच विचार केला नाही. मला दबावाची परिस्थिती समजते, त्यामुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे." तो पुढे म्हणाला, "ज्यापर्यंत टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा प्रश्न आहे, ती माझ्यासाठी खूप असामान्य भूमिका असू शकते. भारतीय क्रिकेटमध्ये खूप प्रतिभा आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणे माझ्यासाठी नक्कीच आकर्षक असेल.
राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक कधी झाले?
राहुल द्रविड नोव्हेंबर 2021 मध्ये वरिष्ठ पुरुष भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला होता, परंतु बीसीसीआयने काही दिवसांचा कार्यकाळ वाढवला होता. राहुल द्रविडसह, कोचिंग स्टाफच्या इतर सदस्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला, ज्यात फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांचा समावेश आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात.
नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ किती?
टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 1 जुलै 2024 पासून सुरू होईल, जो 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल. नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात, टीम इंडिया एकूण 5 ICC ट्रॉफी खेळणार आहे, ज्यात चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 2 चषकांचा समावेश आहे.
संबंधित बताम्या: