BCCI Central Contract : IPL दरम्यान 3 भारतीय खेळाडूंचे नशीब फळफळणार, BCCI केंद्रीय करारात स्थान मिळण्याची शक्यता, जाणून घ्या कोण बाहेर?
भारतीय खेळाडू सध्या बीसीसीआयकडून देण्यात येणाऱ्या केंद्रीय कराराची वाट पाहत आहेत. खरंतर, त्याची घोषणा आधीच व्हायला हवी होती, पण काही कारणांमुळे ती लांबणीवर पडत आहे.

BCCI Central Contract 2025-2026 : भारतीय खेळाडू सध्या बीसीसीआयकडून देण्यात येणाऱ्या केंद्रीय कराराची वाट पाहत आहेत. खरंतर, त्याची घोषणा आधीच व्हायला हवी होती, पण काही कारणांमुळे ती लांबणीवर पडत आहे. बीसीसीआयने अद्याप याची घोषणा केलेली नसली तरी, याबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय करारात तीन खेळाडूंची एन्ट्री होऊ शकते, असे कळले आहे.
IPL 2025 दरम्यान 3 भारतीय खेळाडूंचे नशीब फळफळणार
बीसीसीआय लवकरच भारतीय खेळाडूंसाठी केंद्रीय करार जाहीर करणार असल्याचे कळले आहे. त्यात बदल होण्याची फारशी शक्यता नाही, परंतु काही नवीन आणि युवा खेळाडूंना त्यात स्थान दिले जाऊ शकते. क्रिकबझच्या एका अहवालात असे दिसून आले आहे की, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांना पहिल्यांदाच केंद्रीय करारात समाविष्ट केले जाऊ शकते.
अभिषेक शर्माबद्दल असे म्हटले जात आहे की, त्याला सी ग्रेडमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. बीसीसीआयचा नियम असा आहे की जो खेळाडू निर्धारित कालावधीत किमान तीन कसोटी, आठ एकदिवसीय किंवा 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळतो त्याला आपोआप सी ग्रेडमध्ये स्थान मिळते. त्यामुळे अभिषेक शर्मा यासाठी पात्र आहे. त्याने निर्धारित कालावधीत 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जर आपण नितीश कुमार रेड्डीबद्दल बोललो तर त्यांनी भारतासाठी कसोटी देखील खेळली आहे. त्याने भारतासाठी पाच कसोटी आणि चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याचा अर्थ असा की त्याच्या जागेबद्दलही फारसे प्रश्न नसावेत.
हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती प्रबळ दावेदार
याशिवाय हर्षित राणासाठी दरवाजे उघडताना दिसत आहेत. हर्षित राणा आतापर्यंत भारतासाठी दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळला आहे. जरी तो निर्धारित वेळेत पुरेसे सामने खेळू शकला नसला तरी, त्याने तिन्ही फॉरमॅट खेळले असल्याने तो पण प्रबळ दावेदार आहे. याशिवाय, वरुण चक्रवर्तीचाही दावेदारांच्या यादीत समावेश आहे, ज्याने आता भारतीय संघासाठी चार एकदिवसीय आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
श्रेयस अय्यर करणार पुनरागमन
केंद्रीय कराराबद्दल मोठी बातमी अशी आहे की, श्रेयस अय्यर त्यात पुनरागमन करत असल्याचे दिसून येत आहे. ज्याला गेल्या वर्षी त्यातून वगळण्यात आले होते. श्रेयस अय्यर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसला आणि त्याने संपूर्ण स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. अलिकडेच आयसीसीने त्याला मार्च महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडले. याचा अर्थ तो केंद्रीय करारात असणार हे निश्चित आहे.
रोहित, कोहली आणि जडेजा ग्रेड ए प्लस कायम असणार, अश्विन बाहेर
यावेळी बोलायचे झाले तर, रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे ए प्लस श्रेणीत आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी त्यांना अजूनही त्याच श्रेणीत ठेवले जाईल, म्हणजेच बदलाची शक्यता खूपच कमी आहे. पण बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून रविचंद्रन अश्विन बाहेर जाईल. अश्विनने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. बीसीसीआय लवकरच केंद्रीय कराराची अधिकृत घोषणा करेल असे मानले जात आहे.





















