Pakistan Cricket Team Captain: 5 सामन्यानंतर शाहीनची उचलबांगडी; बाबर आझमची पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती
Pakistan Cricket Team Captain: 2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी खराब झाली होती. या स्पर्धेनंतर बाबरने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले होते.
Pakistan Cricket Team Captain: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा एकदा बाबर आझमकडे कर्णधारपद सोपवले आहे. बाबर टी-20 आणि वनडे फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व करेल. निवड समितीच्या शिफारशीनंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी हा निर्णय घेतला आहे. शान मसूद पाकिस्तानच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. गेल्या दिवसांपासून पाकिस्तानच्या संघात कर्णधारपदावरून बराच गदारोळ झाला होता.
2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी खराब झाली होती. या स्पर्धेनंतर बाबरने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले होते. बाबरनंतर पीसीबीने शाहीन आफ्रिदीला टी-20 संघाचा कर्णधार बनवले. शान मसूदकडे कसोटीची कमान सोपवण्यात आली होती. मात्र कर्णधार बदलल्यानंतरही संघाच्या कामगिरीत फरक पडला नाही. त्यामुळे 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी पीसीबीने पुन्हा कर्णधार बदलून बाबरकडे जबाबदारी सोपवली.
पीसीबीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती -
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. बोर्डाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बाबर आझमला पांढऱ्या चेंडूच्या (ODI आणि T20) फॉर्मेटचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. निवड समितीच्या शिफारशीनंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी बाबर आझमची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली.
Babar Azam appointed as white-ball captain
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 31, 2024
Following unanimous recommendation from the PCB’s selection committee, Chairman PCB Mohsin Naqvi has appointed Babar Azam as white-ball (ODI and T20I) captain of the Pakistan men's cricket team. pic.twitter.com/ad4KLJYRMK
बाबरचा कर्णधारपदाचा विक्रम -
बाबरच्या कर्णधारपदाचा विक्रम पाहिल्यास पाकिस्तानने 43 वनडे सामने खेळले. या कालावधीत संघाने 26 सामने जिंकले आणि 15 सामने गमावले. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 71 टी-20 सामने खेळले. या कालावधीत संघाने 42 सामने जिंकले आणि 23 सामने गमावले. पाकिस्तानने 20 पैकी 10 कसोटी सामने जिंकले. 6 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 4 अनिर्णित राहिले.
अवघ्या 5 सामन्यांनंतर शाहीन आफ्रिदीचे कर्णधारपद हिसकावून घेतले-
अलीकडेच, एकदिवसीय विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर बाबर आझमच्या जागी शाहीन आफ्रिदीला कर्णधार बनवण्यात आले. टी-20 विश्वचषकात शाहीन आफ्रिदी पाकिस्तानी संघाचे नेतृत्व करेल, असे मानले जात होते, मात्र अवघ्या 5 सामन्यांनंतर शाहीन आफ्रिदीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्यामुळे आता टी-20 विश्वचषकात शाहीन आफ्रिदीच्या जागी बाबर आझम कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, शाहीन आफ्रिदीसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे, केवळ 5 सामन्यांनंतर पीसीबीने कर्णधारपद काढून घेतले.