(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Babar Azam ODI record: बाबर आझमने विराट-सचिनला टाकले मागे, वनडेत सर्वात वेगवान 5 हजार धावा केल्या
Babar Azam ODI record: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Babar Azam ODI record: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बाबर आझम याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान पाच हजार धावा करण्याचा रेकॉर्ड केला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या चौथा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात बाबर आझम याने नव्या विक्रमला गवसणी घातली. बाबर आझम याने दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला याचा विक्रम मोडला आहे. बाबर आझम याने फक्त 97 डावात पाच हजार धावांचा पल्ला पार केला आहे. असा पराक्रम करणारा बाबर एकमेव खेळाडू आहे. बाबर आझम याने सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि विवियन रिचर्डस यांचा विक्रम मोडलाय.
बाबारने कोणत्या खेळाडूंना टाकले मागे -
बाबर आझम याने फक्त 97 डावात पाच हजार धावांचा पल्ला पार केला आहे. 100 पेक्षा कमी डावात पाच हजार धावांचा पल्ला गाठणारा बाबर पहिलाच खेळाडू आहे. बाबर आझम याने हाशिम आमलाचा विक्रम मोडीत काढला. हाशिम आमला याने 101 डावात पाच हजार धावा चोपल्या होत्या. आमला आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. तर वेस्ट इंडिजचा दिग्गज विवियन रिचर्ड्स यांनी 114 डावात 5,000 धावा केल्या होत्या. त्याशिवाय रनमशीन विराट कोहली यानेही 114 डावात पाच हजार धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेविड वार्नर याने 115 डावात पाच हजार धावांचा पल्ला गाठला होता.
Babar Azam becomes the fastest ever to complete 5000 runs in ODI history.
— Johns. (@CricCrazyJohns) May 5, 2023
5000* runs from 97 innings including 17 hundreds & 26 fifties. pic.twitter.com/SxrhfvIcQi
पाकिस्तानच्या कोणत्या खेळाडूंना टाकले मागे -
बाबर आझमच्या आधी पाकिस्तानकडून सर्वात वेगवान पाच हजार धावा काढण्याचा विक्रम सईद अनवर आणि यूसुफ योहाना (मोहम्मद यूसुफ) यांच्या नावावर होता. या दोघांनी 138 डावात पाच हजार धावांचा पल्ला पार केला होता. बाबर आझम याने 97 व्या डावात हा करिश्मा केला आहे. बाबर आझम याने आतापर्यंत 17 शतके आणि 26 अर्धशतके झळकावली आहेत. बाबार आझम वनडेमध्ये आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
वनडेत दमदार सरासरी -
बाबर आझम याने वनडेमध्ये जवळपास 60 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडलाय. विराट कोहली याने 58 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. विराट कोहलीपेक्षा चांगल्या सरासरीने बाबरने वनडेत धावा चोपल्यात. या दोघांचा अपवाद वगळता इतर एकाही फलंदाजाची सरासरी 55 पेक्षा जास्त नाही. वनडेमध्ये बाबरचा स्ट्राइक रेट 89.26 इतका आहे.