Neeraj Chopra: अभिनंदन चॅम्पियन! अनुराग ठाकूर यांच्याकडून डायमंड ट्रॉफी जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं कौतुक
Diamond League Trophy: भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) डायमंड लीगमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली.
Diamond League Trophy: भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) डायमंड लीगमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. डायमंड लीगच्या पुरुष गटातील अंतिम फेरीत 24 वर्षीय नीरजनं 88.44 मीटर भालाफेक करुन प्रतिष्ठित डायमंड ट्रॉफी जिंकलीय. महत्वाचं म्हणजे, डायमंड ट्रॉफी जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. नीरजच्या कामगिरीनंतर संपूर्ण देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. याचदरम्यान, केंद्रीय क्रिडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनीही नीरज चोप्राचं तोंडभरून कौतुक केलंय. नीरज चोप्रानं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर खेळांना नव्या उंचीवर नेल्याचं अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय.
डायमंड ट्रॉफीमध्ये नीरजनं 88.44 मीटरचा भाला फेकून सुवर्णपदकावर कब्जा केला. डायमंड ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या प्रयत्नात नीरजचा पहिला थ्रो फाऊल ठरला. पण, दुसऱ्या प्रयत्नांत त्यानं 88.44 मीटर भालाफेकून भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं. चेक गणराज्याचे ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता जॅकब वाडलेज 86.94 मीटरसह दुसऱ्या स्थानावर राहिला. तर, जर्मनीचे जूलियन वेबर 83.73 मीटरच्या प्रयत्नासह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
अनुराग ठाकूर यांचं ट्वीट-
अनुराग ठाकूर काय म्हणाले?
अनुराग ठाकूर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून नीरज चोप्राचं तोंडभरून कौतूक केलं. "नीरज चोप्रानं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय खेळांना नवीन उंचीवर नेलंय. तुझ्या या यशस्वी प्रवासात तुला समर्थन करण्याबाबत क्रिडा मंत्रालयाला अभिमान वाटतो.अभिनंदन चॅम्पियन!!"
नीरज चोप्राची दमदार कामगिरी
नीरज चोप्रानं दमदार प्रदर्शनाच्या जोरावर संपूर्ण जगाभरातील क्रिडाप्रेमींचं लक्ष वेधून घेतलंय. दरम्यान, 2021 मध्ये टोकोयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. याआधी 2018 मधील आशिया स्पर्धा आणि कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली होती. त्यानंतर 2022 मध्ये पार पडलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स स्पर्धेतही नीरजनं रौप्यपदक जिंकलं होतं. नुकतंच बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतही नीरज चोप्राचं पदक जवळपास निश्चित मानलं जातं होतं. परंतु, दुखापतीमुळं त्याला या स्पर्धेत भाग घेता आला नाही. मांडीला दुखापत झाल्यानं त्याला एक महिना मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळं तो बर्मिंगहम येथे 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत तो खेळू शकला नाही. मात्र, त्यानं डायमंड लीग जिंकण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्याचं हे स्वप्न सत्यात उतरलं.
हे देखील वाचा-