Suryakumar Yadav : रोहितनं एकट्यानं बघितलं नसतं आम्ही पण बघितलं असतं... अजितदादांकडून सूर्यकुमारच्या कॅचवर टोलेबाजी...Video
Ajit Pawar : सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या कॅचबद्दल रोहित शर्मानं म्हटलं होतं की त्यानं कॅच घेतला नसता तर बघितला असता यावर अजित पवारांनी कमेंट केली.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानभवनात टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा, (Rohit Sharma) सूर्यकुमार यादव,(Suryakumar Yadav) शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वालसह सपोर्ट स्टाफचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलेबाजी केली.
फायनल मॅचमध्ये 30 बॉल आणि 30 रन हव्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू खेळत होते ते पाहून क्रीडा रसिकांनी आशा सोडली होती. पण काही तरी चमत्कार घडेल असे मला वाटत होते आणि चमत्कार घडला. पहिल्या सामन्यापासून आपण जिंकत होतो. रोहित शर्मा चांगल्या पद्धतीनं खेळत होता. विराट पुढं आला आणि त्याची बॅट तळपली. अक्षर पटेलची बॅट तळपली, शिवम दुबेची बॅट तळपली. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यानं चांगली कामगिरी केली.
पाहा व्हिडिओ :
मरीन ड्राईव्हला मी कधीच एवढी गर्दी पाहिली नव्हती. वरच्यांना सांगायचं आहे, चारही खेळाडू चांगल्या प्रकारे दिसत आहेत.वरती व्यवस्थित बसा खाली पडू नका असं अजित पवार म्हणाले.भारतासारखं क्रिकेटवरील प्रेम इतरत्र कुठं पाहायला मिळत नाही. अमेरिकेचा संघ देखील पुढील काळात चांगला खेळ करेल.
रोहित शर्मा, सूर्य कुमार यादवचे खूप खूप कौतुक करतो. सूर्यकुमारनं ज्या प्रकारे कॅच घेतला. त्याचा पाय बाहेर टेकला असता तर आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता. तू अप्रतिम झेल संपूर्ण भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते. रोहितनं सांगितलं नसता घेतला तर तुझ्याकडे बघितलं असतं, पण रोहितनं एकट्यानं बघितलं नसतं आम्ही पण बघितलं असतं.
आमचे लोक फार वेडे आहेत. जिंकल्यावर उदो उदो करतात. हरल्यानंतर दगड मारायला कमी नाही करत, असं अजित पवार म्हणाले. आपल्याला खिलाडूपणा पाहायला मिळत नाही. पण, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी यांनी हा खेळ आपल्यामध्ये रुजवण्याचं काम केलं आहे.
1983 ला वर्ल्ड कप जिंकला होता. आता सूर्यकुमार यादवनं जे काम केलं त्यावेळी कपिल देव यांनी केलं होतं. यशस्वी जयस्वाल नवखा आहे, शिवम दुबे ज्यावेळी भाषणाला उठला त्यावेळी भाषण करायला सांगू नका असं म्हटला. मी फक्त त्याला जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हणायला सांगितलं, असं अजित पवार म्हणाले. रोहित शर्मा आता टी 20 क्रिकेट खेळणार नाही पण पुढच्या काळात भारतीयांना तुझी आठवण येईल, असं अजित पवार यांनी म्हटलं.
संबंधित बातम्या :
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं - रोहित शर्मा