Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने विदर्भाचा पराभव करून रणजी करंडक 2024 चे विजेतेपद पटकावले होते. आता मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात इराणी चषक सामना होणार आहे. हा सामना लखनौमध्ये 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे, यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपला संपूर्ण संघ अद्याप जाहीर केलेला नाही. आता श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर इराण चषकात होणाऱ्या सामन्यासाठी मुंबई संघात खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याची बातमी समोर आली आहे.
अजिंक्य रहाणे करणार मुंबई संघाचे नेतृत्व
क्रिकबझच्या वृत्तानुसार, इराणी कपमध्ये अजिंक्य रहाणे मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर यांनी संघात स्थान मिळाले आहेत. श्रेयस टीम इंडियाच्या संघातून बाहेर आहे आणि भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची निवड झालेली नाही. या कारणास्तव तो दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला, जिथे त्याने इंडिया-डी संघाचे नेतृत्व केले. बुची बाबू स्पर्धेतही तो खेळला होता. पण अय्यरची बॅट शांत राहिली.
दुसरीकडे शार्दुल ठाकूरच्या मुंबईत सामील झाल्याचा फायदा संघाला होणार आहे. तो उत्कृष्ट गोलंदाजी करतो आणि खालच्या क्रमाने फलंदाजी करण्यात तो पटाईत आहे. जूनमध्ये त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तो नुकताच केएससीए स्पर्धेत सहभागी झाला होता. क्रिकबझच्या वृत्तानुसार, त्याने आता पाच दिवसांच्या प्रथम श्रेणी सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचे घोषित केले आहे.
रहाणेने शेवटचा सामना 2023 मध्ये खेळला
अजिंक्य रहाणेने 2023 साली वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. संघात सध्या सरफराज खान आणि ध्रुव जुरेलसारखे युवा खेळाडू आहेत, जे मधल्या फळीत खेळून संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत. रहाणेने भारतीय संघासाठी आतापर्यंत 85 कसोटी सामन्यांमध्ये 5077 धावा केल्या आहेत, ज्यात 12 शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.
हे ही वाचा -
Ajinkya Rahane : सरकारची घोषणा अन् अजिंक्य रहाणे झाला कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण