Ajinkya Rahane Team India: गेल्या अनेक दिवसांपासून अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) टीम इंडियाच्या (Team India) संघात संधी मिळालेली नाही. मात्र त्याने आता पुन्हा टीम इंडियाचे दार ठोठावले आहे. अजिंक्य रहाणेने काऊंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू 2024 च्या सामन्यात लिसेस्टरसाठी शतक झळकावले आहे. तसेच या स्पर्धेत अजिंक्य रहाणे चांगली कामगिरी करत असल्याने त्याला कसोटी संघात स्थान मिळणार का?, अशी चर्चा रंगली आहे. 


अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) 192 चेंडूत 102 धावा केल्या. अजिंक्य रहाणेच्या या कामगिरीच्या जोरावर लिस्टर संघाने 300 धावांचा पल्ला ओलांडला. आगामी काही दिवसांत टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका रंगणार आहे. या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. येत्या काही दिवसांत टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान अजिंक्य रहाणेने शतक झळकवल्याने टीम इंडियात पुनरागमनाच्या आशा वाढल्या आहेत. 


अजिंक्य रहाणेच्या 192 चेंडूत 102 धावा-


काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये कार्डिफमध्ये लिसेस्टरशायर आणि ग्लॅमॉर्गन यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान लिसेस्टरशायरच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने 192 चेंडूत 102 धावा केल्या. अजिंक्य रहाणेने या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकारही टोलावला. या शतकापूर्वी अजिंक्य रहाणे गेल्या तीन डावात काही खास करू शकला नाही. मात्र त्याआधी त्याने सलग दोन अर्धशतके झळकावली होती. हॅम्पशायरविरुद्ध त्याने 70 धावांची खेळी खेळली. तसेच ग्लॉसेस्टरविरुद्ध 62 धावा केल्या.






अजिंक्य रहाणेने टीम इंडियासाठी शेवटचा सामना कधी खेळला होता?


अजिंक्य रहाणेने टीम इंडियासाठी शेवटची कसोटी जुलै 2023 मध्ये खेळली होती. या सामन्यानंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. आता भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत अजिंक्य रहाणेला संधी दिली जाऊ शकते. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रहाणेने 85 कसोटी सामन्यात 5077 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 12 शतके आणि 26 अर्धशतके केली आहेत. अजिंक्य रहाणेची कसोटी सर्वोत्तम धावसंख्या 188 धावा आहे.


टीम इंडिया WTC ची अंतिम फेरी गाठणार?


बांगलादेशनंतर भारतीय संघ मायदेशी न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी या सर्व कसोटी मालिका खूप महत्त्वाच्या असतील. भारतीय संघापुढे सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याचे ध्येय असणार आहे. 


संबंधित बातमी:


भारत अन् बांगलादेशची कसोटी मालिका रंगणार; सुरेश रैनाच्या विधानाने टीम इंडियाची वाढली चिंता!