Ind vs Ban Suresh Raina: टीम इंडिया आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका रंगणार आहे. 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया (Team India) आणि बांगलादेश (Bangladesh) या मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र या मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याने टीम इंडिया बांगलादेश संघाविरुद्ध खेळताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश (Pak vs Ban) यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 10 विकेट्सने पराभव केला. गोलंदाजी आणि फलंदाजीत बांगलादेशचा संघ भक्कम दिसून आला. त्यामुळे आगामी मालिकेत बांगलादेशला टीम इंडियाने कमी लेखू नये, असा सल्ला सुरेश रैनाने दिला आहे.
सुरेश रैना नेमकं काय म्हणाला?
एएनआयशी बोलताना सुरेश रैना म्हणाला की, आता नवीन कसोटी संघ तयार होणार आहे. बांगलादेशकडे चांगले फिरकीपटू आहे. बांगलादेशकडे अनेक चांगले खेळाडू आहेत जे बऱ्याच काळापासून चांगली कामगिरी करत आहेत. तसेच या मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये होणार आहे. कानपूरची खेळपट्टी फिरकीपटूंना खूप मदत करते. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल, असं सुरेश रैना म्हणाला. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेमुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन दौऱ्याची तयारी करता येईल, असंही सुरेश रैनाने सांगितले. सुरैश रैनाच्या या विधानाने टीम इंडियाची चिंता वाढली आहे.
टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा WTC ची अंतिम फेरी गाठणार?
बांगलादेशनंतर भारतीय संघ मायदेशी न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी या सर्व कसोटी मालिका खूप महत्त्वाच्या असतील. भारतीय संघापुढे सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याचे ध्येय असणार आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेशचा पहिला कसोटी सामना कसा राहिला?
पाकिस्तान विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने 448 धावांवर 6 विकेट गमावून डाव घोषित केला. यादरम्यान पाकिस्तानकडून सौद शकीलने 141 आणि मोहम्मद रिझवानने 171 धावा केल्या. यानंतर बांगलादेशचा संघ 565 धावांवर ऑलआऊट झाला. मुशफिकुर रहीमने साडेआठ तासांहून अधिक काळ चाललेल्या मॅरेथॉन खेळीत 341 चेंडूंत एक षटकार आणि 22 चौकार मारून बांगलादेशला पहिल्या डावात 117 धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला 146 धावांवर ऑलआउट केले आणि त्यांना विजयासाठी केवळ 30 धावांचे लक्ष्य मिळाले. ज्याचा पाठलाग बांगलादेशने 6.3 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केला.
संबंधित बातमी:
'होय, माझं हार्दिक पांड्यावर प्रेम...'; बॉलिवूड अभिनेत्रीचं रोखठोक विधान, नेमकं काय म्हणाली?