NZ vs AFG Test: अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव आणि पहिला कसोटी सामना पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकही होऊ शकली नाही. सततचा पाऊस आणि खराब आऊटफिल्डमुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचा (Afghanistan Vs New Zealand) हा सामना रद्द झाल्याने याची इतिहासात देखील नोंद झाली आहे. अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड ही 91 वर्षांतील पहिली कसोटी ठरली जी पावसामुळे एकही चेंडू टाकल्याशिवाय पूर्णपणे रद्द झाली.  तर हवामानामुळे एकही चेंडू टाकल्याशिवाय सोडण्यात आलेला हा भारतातील पहिला आणि एकूण आठवा कसोटी सामना ठरला. पाच दिवस या सामन्यात एकही चेंडू टाकता आला नाही. सुरुवातीचे दोन दिवस आऊटफील्ड ओले होते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्याच्या या मैदानाच्या तयारीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान न्यूझीलंडचा संघ आता श्रीलंकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे, त्यानंतर 16 ऑक्टोबरपासून भारताविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायला परतणार आहे.






अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड काय म्हणाले?


सामना रद्द झाल्याची माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. बोर्डाच्या वतीने असे लिहिले आहे की, ग्रेटर नोएडामध्ये सततच्या पावसामुळे, बहुप्रतिक्षित अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द करण्यात आला. अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंडची पहिली कसोटी अपेक्षेप्रमाणे पार पडली नाही. अफगाणिस्तान भविष्यात न्यूझीलंडविरुद्ध आणखी द्विपक्षीय क्रिकेटसाठी उत्सुक असल्याचं अफगाणिस्तान बोर्डाने म्हटलं आहे. 


आता दोन्ही संघ कोणाविरुद्ध मालिका खेळणार?


कसोटी सामना रद्द झाल्यानंतर, आता अफगाणिस्तान संघ यूएईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, तर न्यूझीलंड संघ 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. याशिवाय न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 18 ते 30 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.


संबंधित बातमी:


...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट खाली बसले; सर्वांचे मन जिंकले, नेमकं काय घडलं?, पाहा Video