PM Narendra Modi Meets Navdeep Singh: पॅरिसमध्ये पॅरिलिम्पिक स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत नेहमीप्रमाणे भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणाऱ्या खेळाडूंसोबत संवाद साधला. यावेळी भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नवदीप सिंगसोबतच्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि नवदीप सिंग (Navdeep Singh) यांच्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
नवदीप सिंगचा (Navdeep Singh) थ्रो फेकल्यानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्याने आक्रमक अंदाजात काही अपशब्दही उच्चारले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी साडेचार फूट उंचीच्या नवदीप सिंगचा विशेष सन्मान केला. यावेळी नवदीपने पंतप्रधान मोदींना टोपी घालण्याची विनंती केली. यावर नरेंद्र मोदी खाली बसले आणि नवदीपने नरेंद्र मोदींना टोपी घातली, तसेच आपल्या जर्सीवर त्यांचा ऑटोग्राफही घेतला. नरेंद्र मोदींच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत.
तुला एवढा राग का येतो?; नरेंद्र मोदींचा प्रश्न-
नवदीप सिंगने पॅरालिम्पिकमध्ये भाला फेकल्यानंतर उत्साहात शिवीगाळ केली तेव्हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या भेटीदरम्यान नरेंद्र मोदींनी नवदीपला त्याच्या रागाचे कारण विचारले. तुला एवढा राग का येतो?, असा सवाल नरेंद्र मोदींनी नवदीपला विचारला. यावर सर, गेल्यावेळी मी चौथ्या क्रमांकावर आलो होतो. यावेळी मी आपल्याला वचन दिले होते आणि ते पूर्ण केले (पदक जिंकले), असं नवदीप हसत म्हणाला.
नवदीप सिंगने रचला इतिहास-
नवदीप सिंगने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये एफ-41 प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल इराणच्या खेळाडूला अपात्र ठरवल्यानंतर त्याला सुवर्णपदक देण्यात आले. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये नवदीप चौथ्या स्थानावर राहिला होता, पण पॅरिसमध्ये सुवर्ण जिंकून त्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नवदीपच्या प्रशिक्षकाने तर नवदीपचे तंत्र नीरज चोप्रापेक्षा चांगले असल्याचे सांगितले होते. दरम्यान, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच नवदीपच्या वडिलांचं निधन झालं आहे. परंतु, तो धक्का पचवून मैदानात उतरलेल्या नवदीपने देशाला नवी सुवर्णझळाळी मिळवून दिली.
संबंधित बातमी:
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया चेन्नईत पोहचली; रोहित शर्मासोबत कोण कोण?