(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cup 2023 : आधी इंग्लंड, मग पाकिस्तान आणि आता श्रीलंका... अफगाणिस्तानचा विश्वचषकातील तिसरा विजय
Afghanistan vs Sri Lanka Full Match Highlights : आधी इंग्लंड, मग पाकिस्तान आणि आता श्रीलंका.... अफगाणिस्ताननं तीन बलाढ्य प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवून यंदाचा विश्वचषक गाजवला आहे.
Afghanistan vs Sri Lanka Full Match Highlights : आधी इंग्लंड, मग पाकिस्तान आणि आता श्रीलंका.... अफगाणिस्ताननं तीन बलाढ्य प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवून यंदाचा विश्वचषक गाजवला आहे. पुण्यातल्या एमसीए स्टेडियमवरच्या सामन्यात अफगाणिस्ताननं श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या प्रभावी आक्रमणासमोर श्रीलंकेचा अख्खा डाव २४१ धावांत आटोपला होता. अफगाणिस्तानकडून फाझल हक फारुखीनं चार आणि मुजीब उर रहमाननं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. अफगाणिस्तानचा रहमानउल्लाह गुरबाज भोपळाही फोडू शकला नाही. पण त्यानंतर अफगाणी फलंदाजांनी प्रत्येक विकेटसाठी भक्कम भागीदारी रचून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झादराननं ३९, रहमत शाहनं ६२, हशमत शाहिदीनं नाबाद ५८ आणि अझमत ओमरझाईनं नाबाद ७३ धावांची खेळी उभारली. अफगाणिस्ताननं तीन विजयांसह विश्वचषकाच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. तीन विजयासह अफगाणिस्तान संघाने सेमीफायनलचे आव्हान जिवंत ठेवलेय. पुढील तिन्ही सामन्यात अफगाणिस्तान संघाने विजय मिळवल्यास सेमीफायनलचे तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 241 धावांपर्यंत मजल मारली होती. अफगाणिस्तान संघाने हे आव्हान 45.2 षटकात अवघ्या तीन विकेटच्या मोबदल्यात पार केले. अफगानिस्तानसाठी रहमत शाह याने 62 धावा केल्या. तर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने 74 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 58 धावा जोडल्या. अजमतुल्लाह ओमरजई याने 63 चेंडूमध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 73 धावा चोपल्या. या दोघांनी मॅच विनिंग 111 धावांची भागिदारी केली.
श्रीलंकेने दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात अतिशय खराब झाली. स्टार फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज पहिल्याच षटकात खातेही न उघडता बाद झाला. पण त्यानंतर अफगाणिस्तानच्या इतर फलंदाजांनी विजयी खेळी केली. रहमत शाह आणि इब्राहिम जादरान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांचे योगदान दिलेय. दोघेही सहज धावा काढत होते, एकेरी दुहेरी धावसंख्येसोबत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत होते. इब्राहिम जादरान याने 57 चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 39 धावा काढून बाद झाला. त्यानंतर रहमत शाह आणि कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी यांनीही डाव सावरला.
रहमत शाह याने 74 चेंडूमध्ये चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 62 धावा केल्या. तीन विकेट गेल्यानंतर कर्णधार शाहिदीने अष्टपैलू अजमतुल्लाह ओमरजई याच्यासोबत विजयी 111 धावांची भागिदारी केली. हशमतुल्लाह शाहिदी याने 74 चेंडूमध्ये दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 58 धावा केल्या. तर अजमतुल्लाह ओमरजई याने 63 चेंडूमध्ये 6 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 73 धावा केल्या. दरम्यान, श्रीलंकाकडून दिलशान मदुशंका याने सुरुवातीलाच दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय कसून रजिता याने एक विकेट घेतली. इतर एकाही गोलंदाजाला यश मिळाले नाही.