Sarfaraz Khan IND Vs ENG Test : पहिल्याच टेस्टमध्ये चमकला, तरीही बेंचवर; सरफराजसाठी दिग्गज मैदानात; BCCI ला सुनावलं; म्हणाला, विश्वास नसेल तर...
इंग्लंड दौऱ्यात भारत-अ संघाकडून आणि सराव सामन्यात जबरदस्त फलंदाजी करून सरफराज खानने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं.

Aakash Chopra on sarfaraz khan : इंग्लंड दौऱ्यात भारत-अ संघाकडून आणि सराव सामन्यात जबरदस्त फलंदाजी करून सरफराज खानने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सरफराज खानला संघात स्थान मिळाले नाही. ज्यावर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने थेट बीसीसीआयवर नाराजी व्यक्त करत सरफराजसाठी जोरदार बॅटिंग केली आहे.
सरफराजला अलीकडेच भारत-अ संघात स्थान मिळाले. जिथे त्याने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा सारख्या अव्वल गोलंदाजांविरुद्ध शतक ठोकले. यापूर्वी, त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत 150 धावांची शानदार खेळी खेळली होती. इतकेच नाही तर त्याने त्याच्या पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये अर्धशतकेही झळकावली. तरीही, त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही आणि आता त्याला इंग्लंड मालिकेतूनही वगळण्यात आले आहे.
आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, 'सरफराजने आतापर्यंत काहीही चुकीचे केलेले नाही. जेव्हा त्याला खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याने 90 पेक्षा जास्त धावा केल्या. तरीही, त्याला पुढच्या सामन्यात खेळवण्यात आले नाही आणि आता त्याचे नाव कसोटी संघात नाही. ही काही बरोबर वाटत नाही.'
'त्याला भारत-अ संघातही पाठवू नये...' - आकाश चोप्रा
तो पुढे म्हणाला की, जर निवडकर्त्यांना त्याच्या खेळावर विश्वास नसेल, तर त्याला भारत-अ संघातही पाठवू नये. आकाश म्हणाला की, जर तुम्हाला वाटत असेल की तो धावा करू शकत नाही, तर त्याला भारत-अ संघात का पाठवण्यात आले? आणि जर तुम्हाला वाटत असेल की तो धावा करू शकतो, तर तो कसोटी संघात का नाही?
चाहत्यांनीही सरफराजबद्दल सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. सातत्याने धावा करूनही त्याला संधी का मिळत नाही असे प्रश्न उपस्थित केले. आतापर्यंत फक्त एवढेच स्पष्ट केले आहे की भारत-अ संघाचा गोलंदाज हर्षित राणाला इंग्लंड कसोटी मालिकेसाठी राहण्यास सांगण्यात आले आहे. पहिला कसोटी सामना 20 जूनपासून हेडिंग्ले येथे खेळला जाईल.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल.





















