Team India: टीम इंडियाला (Indian Criclet Team) मायदेशी आणण्यासाठी एक विशेष विमान बार्बाडोसमध्ये दाखल झालं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंच्या परतीसाठी विमान पाठवले आहे. एअर इंडियाचे बोईंग 777 बार्बाडोस विमानतळावर पोहोचले आहे. उद्या सकाळी 6 वाजता टीम इंडिया दिल्लीत दाखल होणार आहे.


टीम इंडियाने 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन टी-20 विश्वचषकावर (T20 World Cup 2024) आपले नाव कोरले. 2013 नंतर टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली.  या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देश आपल्या टीमचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. मात्र टीम इंडिया अजूनही बार्बाडोसमध्ये अडकून पडली आहे. बेरिल चक्रीवादळामुळे येथील विमानतळ बंद करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण शहरात संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.






पत्रकारांनाही मायदेशी आणणार-


टीम इंडियाला घेण्यासाठी विशेष विमान बार्बाडोसला पोहोचल्याची माहिती देण्यात आली. टीम इंडियाचे खेळाडू येथून दिल्लीला परततील. यासोबतच एका खास कारणासाठी बीसीसीआयचे कौतुक केले जात आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियासोबतच तिथे अडकलेल्या पत्रकारांनाही परत आणण्याची घोषणा केली आहे. भारतीय मीडियातील अनेक लोक कव्हरेजसाठी बार्बाडोसला गेले होते. मात्र वादळामुळे ते तिथेच अडकले. त्यांची विमानाची तिकिटेही रद्द करण्यात आली. त्यामुळे पत्रकारांनाही मायदेशी आणण्यात येणार आहे.


मुंबईत विजयी मिरवणूक?


टीम इंडिया मायदेशात दाखल झाल्यानंतर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते सर्व खेळाडूंना गौरवण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे. तसेच नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. यानंतर मुंबईत विश्वचषकाच्या ट्रॉफीसह सर्व खेळाडू ओपनडेक बसमधून विजयी मिरवणूक काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत बीसीसीआयकडून अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. 


दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारताचा विजय-


भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने 59 चेंडूत सर्वाधिक 76 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावत 169 धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.


संबंधित बातम्या:


हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमंक काय घडलं?


रोहित-विराटपासून डेव्हिड वॉर्नरपर्यंत; 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर कोणी-कोणी निवृत्ती घेतली?