Indian Cricket Team In Mumbai: टीम इंडियाने (Indian Criclet Team) 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन टी-20 विश्वचषकावर (T20 World Cup 2024) आपले नाव कोरले. 2013 नंतर टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देश आपल्या टीमचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. मात्र टीम इंडिया अजूनही बार्बाडोसमध्ये अडकून पडली आहे.
29 जून रोजी अंतिम सामना खेळला गेला, त्यानंतर तेथे आलेल्या चक्रीवादळाने टीम इंडियाला बार्बाडोसमध्येच राहावे लागले. वादळामुळे बार्बाडोसचे विमानतळ बंद करण्यात आले असून तेथे कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. टीम इंडिया गेल्या मंगळवारी तिथून रवाना होणार होती, पण त्याला देखील उशीर झाला. त्यामुळे उद्या सकाळी 6 वाजता टीम इंडिया दिल्लीत दाखल होणार आहे. यासाठी एक एअर इंडियाचं विशेष विमान बार्बाडोस विमानतळावर दाखल झाले आहे.
मुंबईत विजयी मिरवणूक?
टीम इंडिया मायदेशात दाखल झाल्यानंतर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते सर्व खेळाडूंना गौरवण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे. तसेच नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. यानंतर मुंबईत विश्वचषकाच्या ट्रॉफीसह सर्व खेळाडू ओपनडेकबसमधून विजयी मिरवणूक काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत बीसीसीआयकडून अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही.
2007 साली काढली होती मिरवणूक-
नवख्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली नव्या दमाच्या टीम इंडियाने पाकिस्तानला लोळवून 2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जगज्जेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंची मुंबईमध्ये ओपन बसमधून जंगी मिरवणूक निघाली होती. तब्बल आठ तास चाललेल्या विश्वविजयी मिरवणूक संघाचे स्वागत करण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. जगज्जेत्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली जात असून बीसीसीआयने याबाबत प्रचंड गोपनीयता बाळगली असावी, अशीही शक्यता क्रिकेट जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
बीसीसीआयकडून टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस-
बीसीसीआयने भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाला बीसीसीआय 125 कोटी रुपये देणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह ट्विटरद्वारे म्हणाले की, मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की, भारतीय संघाला आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमंक काय घडलं?
रोहित-विराटपासून डेव्हिड वॉर्नरपर्यंत; 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर कोणी-कोणी निवृत्ती घेतली?