Hardik Pandya Natasha Stankovic T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अंतिम षटकात टिच्चून मारा करीत भारताला विजय मिळवून देणारा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा भारतीयांसाठी हीरो झाला आहे. काही महिन्यांपूर्वी ट्रोलर्सकडून खलनायक ठरविला गेलेला हार्दिक पांड्या आता भारतीय विश्वविजयाचा नायक म्हणविला जातो आहे. पण, असे असले तरी हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ थांबण्याचे नाव घेत नाही. 


हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिच (Natasha Stankovic) यांच्यात आलबेल नसल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे. कदाचित त्यांचा काडीमोडदेखील होऊ शकतो, अशा बातम्याही पसरल्या होत्या. या गोष्टींना आता पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. भारताच्या विश्वविजयानंतर खेळाडूंच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर सेलिब्रेशनच्या अनेक पोस्ट केल्या होत्या. पण, नताशाने मात्र अभिनंदनाची साधी एक पोस्टदेखील टाकलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी संशय व्यक्त करणे सुरू केले आहे.


गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात सर्वकाही आलबेल नाही, असा दावा केला जातोय. नताशाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर काही स्टोरीज शेअर केल्या होत्या. त्या पोस्टचा आधार घेत या दोघांच्या नात्यातील धुसफुसीचा अंदाज लावला जात होता. विशेष म्हणजे यावेळच्या आयपीएल पर्वात हार्दिक पांड्या मैदानात असताना एकाही सामन्यात नताशा स्टेडियममध्ये दिसली नाही. या कारणामुळेही दोघांच्या नात्याच्या अफवेला हवा मिळाली होती. 


अंतिम सामन्यानंतर हार्दिक सर्व बोलून गेला-


अंतिम सामन्यातील विजयानंतर हार्दिक पांड्या अत्यंत भावूक झाला. त्यानंतर हार्दिकने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन दिली. त्याने म्हटले की, हा विजय खूप काही आहे. आम्ही खूप भावूक झालो आहोत, आम्ही मेहनत करत होतो पण काहीतरी राहून जात होते. पण आज संपूर्ण देशाला जे हवे ते आम्ही करुन दाखवले. गेल्या सहा महिन्यांचा काळ पाहता हा विजय विशेषत: माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्यासोबत काही गोष्टी अयोग्य घडल्या होत्या. मी त्या काळात एकही शब्द बोललो नव्हतो. पण मला माहिती होतं की, मी सातत्याने मेहनत करत राहिलो तर मी झळाळून निघेने आणि मला हवं ते साध्य करेन. त्यासाठी अशी संधी मिळणे हे अधिक विशेष आहे, असे हार्दिक पांड्याने म्हटले.


अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याची अचूक गोलंदाजी-


हार्दिकने शेवटच्या ओव्हरमध्ये टिच्चून गोलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूनंतर भारताचा विजय निश्चित झाल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानावर एकच जल्लोष झाला. या चेंडूनंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यांना अक्षरश: पाण्याची धार लागली. बराच काळ तो मैदानात रडत होता. काही केल्या हार्दिक पांड्याचे अश्रू थांबत नव्हते. यासाठी विशेष कारणही होते. गेल्या सहा महिन्यांचा काळ हा हार्दिक पांड्यासाठी काहीसा आव्हानात्मक राहिला आहे. क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्यात हार्दिक पांड्या संघर्षाचा सामना करत होता.


संबंधित बातमी:


मॉडलिंग, अभिनय ते 'डीजे वाले बाबू'ची हिरोईन; हार्दिक पांड्याची पत्नी नताशा किती कोटींची मालकीण?