37th National Games 2023 : महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघाचे आव्हान संपुष्टात, चंडीगढचा धुव्वा उडवत पुरुष संघ उपांत्य फेरीत
37th National Games 2023 : महाराष्ट्राच्या पुरुष संघाने अखेरच्या साखळी लढतीत चंडीगढचा ४२-१८ असा धुव्वा उडवला. महाराष्ट्राने तीन विजयांसह गटविजेत्याच्या थाटात उपांत्य फेरी गाठली.
पणजी : महाराष्ट्राच्या महिला संघाने सोमवारी अखेरच्या साखळी सामन्यात उत्तर प्रदेशवर ३२-२२ असा विजय मिळवला. परंतु राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिला कबड्डी संघाचे आव्हान संपुष्टात आले. महाराष्ट्राने पहिल्या लढतीत हिमाचल प्रदेशकडून पराभव पत्करला. मग दुसऱ्या सामन्यात राजस्थानशी बरोबरी झाली. तीच महाराष्ट्रासाठी धोकादायक ठरली. ब-गटातून हिमाचल प्रदेश आणि राजस्थानने उपांत्य फेरीत आगेकूच केली.
अपेक्षा टाकळेचा अपेक्षेनुसार बहरलेला चढायांचा खेळ, त्याला युवा चढाईपटू हरजित कौरच्या धडाकेबाज चढायांची लाभलेली साथ आणि अंकिता जगतापच्या दिमाखदार पकडी या बळावर महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर विजय मिळवला. महाराष्ट्राच्या महिला संघाला प्रारंभीची तीन मिनिटे उत्तर प्रदेशने चांगली लढत दिली. पण हरजीत आणि अपेक्षा यांनी गुणांचा सपाटा लावल्यामुळे उत्तरेचा बचाव निरुत्तर झाला. ११व्या मिनिटाला महाराष्ट्राने पहिला लोण चढवला. त्यामुळे पहिल्या सत्राअखेरीस महाराष्ट्राकडे २१-१२ अशी भक्कम आघाडी होती. दुसऱ्या सत्रातही महाराष्ट्राने सामन्यावरील पकड सुटू दिली नाही. महाराष्ट्राची चढाईपटू सलोनी गजमलच्या या सामन्यात पाच पकडी झाल्या.
पुरुष संघ उपांत्य फेरीत; चंडीगढचा धुव्वा
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने अखेरच्या साखळी लढतीत चंडीगढचा ४२-१८ असा धुव्वा उडवला. पंजाब, तामिळनाडू यांना पहिल्या दोन सामन्यांत हरवणाऱ्या महाराष्ट्राने तीन विजयांसह गटविजेत्याच्या थाटात उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राचा मंगळवारी उपांत्य सामना हरयाणा संघाशी होणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा आकाश शिंदे आणि तेजस पाटीलच्या बहारदार चढाया तसेच शंकर गदई आणि अक्षय भोईरच्या प्रेक्षणीय पकडींनी महाराष्ट्राच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. महाराष्ट्राने आठव्या मिनिटाला पहिला लोण चढवत चंडीगढवर दडपण आणले. मग सामना संपेपर्यंत महाराष्ट्राचेच वर्चस्व दिसून आले. मध्यंतराला महाराष्ट्राकडे २५-१० अशी आघाडी होती. त्यामुळे दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राने अन्य काही खेळाडूंनाही संधी दिली. पण चंडीगढचा खेळ दुसऱ्या सत्रातही उंचावला नाही.
योगासने - महाराष्ट्राच्या कल्याणीला रौप्य, छकुलीला कांस्यपदक
महाराष्ट्राच्या कल्याणी चुटे व छकुली सेलोकर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवत योगासनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. या दोन्ही खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वरिष्ठ गटात पारंपरिक योगासनाच्या विभागात हे यश मिळाले. या क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना दोन अनिवार्य आसने करावी लागतात. त्यासाठी प्रत्येकी १५ सेकंदांचा वेळ दिलेला असतो. त्यानंतर आणखी पाच ऐच्छिक आसने करावयाची असतात. त्यासाठी प्रत्येकी १५ सेकंदांचा वेळ दिलेला असतो. २३ वर्षांच्या कल्याणीने गतवर्षी दोन सुवर्णपदके जिंकली होती. ती नागपूर येथे कला शाखेमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात शिकत आहे. नागपूरचीच खेळाडू असलेली छकुली ही भगवती प्रियदर्शनी महाविद्यालयात बी. टेक. करीत आहे. २० वर्षीय छकुलीला गतवर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये दोन सुवर्ण व दोन रौप्यपदके मिळाली होती. या दोन्ही खेळाडू अमित स्पोर्ट्स अकादमी येथे संदेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहेत.