पदार्पणात सूपरफ्लॉप, तरीही श्रीलंका दौऱ्यात स्थान, रियान परागला या 3 कारणामुळे मिळाली संधी!
India Squad for Sri Lanka Tour 2024 : झिम्बाब्वे दौऱ्यात खराब कामगिरी करणाऱ्या रियान परागला श्रीलंका दौऱ्यात वनडे आणि टी20 मालिकेत संधी देण्यात आली आहे.
India Squad for Sri Lanka Tour 2024 : श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयकडून गुरुवारी भारताच्या वनडे आणि टी20 संघाची निवड करण्यात आली. या दोन्ही संघामध्ये रियान परागला स्थान देण्यात आले. रियान परागने झिम्बाब्वे दौऱ्यात टीम इंडियाकडून टी20 मध्ये पदार्पण केले होते. पण या दौऱ्यात रियान पराग याला मोठी खेळी करता आली नव्हती.त्याने अतिशय खराब कामगिरी केली होती. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात रियान परागला संधी मिळण्याची शक्यता कमीच होती. तरीही त्याला श्रीलंका दौऱ्यात वनडे आणि टी20 मालिकेत संधी देण्यात आली आहे. पण रियान परागला टीम इंडियात स्थान का देण्यात आले, नेमकी त्यामागील कारणं काय आहेत.. पाहूयात.
1. IPL मध्ये शानदार कामगिरी -
रियान पराग आयपीएलमध्ये मागील सहा हंगामापासून राजस्थानसाठी खेळत आहे. त्याने 2024 आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करत धावांचा पाऊस पाडला. रियान परागने 14 डावात 52 च्या सरासरीने 573 धावांचा पाऊस पाडला. या हंगामात सर्वाधिक धावा काढणारा अनकॅप खेळाडू ठरला होता. मध्यक्रममध्ये विस्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्यामुळेच निवड समितीने रियान परागला टीम इंडियात स्थान दिले असेल.
2. गोलंदाजीचा अतिरिक्त पर्याय -
मध्यक्रममध्ये फलंदाजी करण्यासोबत रियान पराग लेग स्पिन गोलंदाजीही करतो. त्यामुळेच रियान परागचा निवड समितीने वनडेसाठी विचार केला असेल. श्रीलंकाविरोधातील वनडे मालिकेत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय. पण युवा रियान परागवर विश्वास दाखवला आहे. रियान परागने लिस्ट ए क्रिकेटमध्ये आतापर्यंत 50 विकेट घेतल्या आहेत. तर टी20 मध्ये त्याने 41 जणांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.
3. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस
रियान परागने आयपीएल 2024 मध्ये खोऱ्याने धावा चोपल्या आहेतच. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये आसामकडून खेळताना मागील दोन हंगामात धावांचा पाऊस पाडला आहे. 2022-23 विजय हजारे चषकात 552 धावा चोपत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. तर 2023-2024 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या दहा सामन्यात त्याने 510 धावा केल्या होत्या. रणजी चषकातही त्याने खोऱ्याने धावा चोपल्या. त्याने चार सामन्यात 378 धावा केल्या होत्या.