Under 19 Team India : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. वेस्ट इंडीजच्या अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट मैदानावर हा सामना सुरू आहे. यंदाच्या अंडर-19 विश्वचषकात हरियाणाच्या तीन खेळाडूंची भारतीय संघात निवड झालीय. हरियाणाच्या रोहतकचा निशांत सिंधू, हिसारचा दिनेश बाना आणि भिवानीचा गरव सांगवान हे अंडर-19 विश्वचषकात भारतीय अंडर-19 संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. बॉक्सिंग, कबड्डी आणि कुस्तीसोबतच आता हरियाणाचे खेळाडू क्रिकेटमध्येही आपली छाप सोडत आहेत.
भारतीय संघ अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरीत पाचव्या जगज्जेतेपदापासून अवघा एक पाऊल दूर आहे. तर, इंग्लंडचा संघही दुसऱ्यांदा अंडर- 19 विश्वचषकाचा किताब जिंकण्यासाठी सज्ज झालाय. या स्पर्धेत हरियाणाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. मात्र, हरिणायाचा निशांत सिंधुनं आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्याबाबत हरियाणातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. निशांत सिंधूचे वडील सुनील आणि आई वंदना यांना आशा आहे की, अंतिम सामन्यात भारतीय संघ इंग्लंडला पराभूत करून अंडर-19 चा विश्वचषकावर नाव कोरेल. निशांतला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. तो सतत क्रिकेटचाच विचार करत राहतो आणि फक्त क्रिकेटसाठी जगतो, असंही त्यांनी म्हटलंय.
निशांतचे वडील एका खासगी कंपनीत काम करतात. तर, त्याची आई शाळेत शिक्षिका आहे. घरच्यांना निशांतला प्रथम बॉक्सर बनवायचे होतं. त्यासाठी त्यानं प्रशिक्षणही घेतलं. पण निशांतला क्रिकेटची खूप आवड होती. त्यामुळं घरच्यांनीही त्याला स्थानिक क्रिकेट अकादमीत दाखल केलं. उपांत्यपूर्व फेरीपूर्वी निशांत कोविड पॉझिटिव्ह आला होता, परंतु सध्या तो पूर्णपणे निरोगी असून आता तो अंतिम फेरीत इंग्लंडविरुद्धच्या सामना खेळत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यासाठी त्याच्या कुटुंबांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
हे देखील वाचा-
- IND vs WI : टीम इंडियाची जर्सी मिळाल्यानंतर Deepak Hooda चा आनंद गगनात मावेना
- Australia Tour of Pakistan : 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया जाणार पाकिस्तान दौऱ्यावर
- IND Vs WI: प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत बीसीसीआयकडून कोणतंही लेखी पत्र मिळालं नाही, सीएबी अध्यक्ष अविषेक डालमियाची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha