Commonwealth Games 2022: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने पहिलं पदक मिळवलं आहे. भारताचा वेटलिफ्टर संकेत महादेव सरगर याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. त्याने 55 किलो वजनी गटात एकूण 248 किलोग्राम वजन उचलत ही कामगिरी केली आहे. यावेळी मलेशियाच्या मोहम्मद याने 249 किलोग्राम वजन उचलत सुवर्णपदक मिळवलं. 






55 किलो वजनी गटात सहभागी संकेतने क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नातच 135 किलोग्राम वजन उचललं. ज्यामुळे तो सर्वांत पुढे पोहोचला. त्यानंतर स्नॅच राऊंडमध्ये 113 किलोग्राम  वजन संकेतने उचललं. त्यामुळे त्याने एकूण (113+135) 248 किलोग्राम वजन उचलत एक दमदार असा सुवर्णपदकासाठी प्रयत्न केला. 


दुखापतीमुळे पुढील प्रयत्न अयशस्वी


दुसऱ्या प्रयत्नात संकेतने 139 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो अयशस्वी झाला. तेव्हाच त्याच्या हातालाही दुखापत झाली. तिसऱ्या प्रयत्नात 139 किलो वजन उचलण्याचा त्याने प्रयत्न केला पण दुखापतीमुळे तो अयशस्वी ठरला. ज्यामुळे अखेर त्याचा स्कोर 248 किलोग्राम इतकाच राहिला. 


मलेशियाच्या खेळाडूने जिंकलं सुवर्णपदक  


मलेशियाच्या बिन कसदन मोहम्मद आणिक (Bin Kasdan Mohamad Aniq) याने 142 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला. संकेतला मागे टाकण्यासाठी मलेशियाच्या खेळाडूला तिसऱ्या प्रयत्नात 142 किलोग्राम वजन उचलणं अनिवार्य होतं. ज्यात तो यशस्वी देखील ठरला. त्यामुळे एकूण 249 किलोग्राम वजन उचलत त्याने थेट सुवर्णपदक मिळवलं असून संकेतला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. केवळ एका किलोच्या फरकाने संकेचं सुवर्णपदक हुकलं.


महाराष्ट्राचा सुपुत्र


संकेत सरगर हा मूळचा सांगलीचा असून त्याचे वडील साधी पानाची टपरी चालवतात. त्यामुळे हलाखीच्या परिस्थितीतून प्रयत्नांच्या जोरावर संकेतने एक मोठं यश मिळवलं आहे. त्याने केवळ आणि केवळ मेहनत आणि अथक परिश्रमांच्या जोरावर ही कामगिरी केली असल्याने आज त्याचं सर्व भारतातून कौतुक होत आहे.



 


हे देखील वाचा -