Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे असं म्हणत सर्वपक्षीयांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपनंही त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचं म्हटलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांचं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक आहे. त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मराठी माणसांमुळं मुंबई, महाराष्ट्राला वैभव प्राप्त झालं आहे. राज्यपाल हे मोठं पद आहे. एक संविधानिक पद आहे, कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायलाच हवी. मराठी माणसांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली आहे, असंही ते म्हणाले.
मराठी माणसांमुळं मुंबईला वैभव मिळालंय- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी माणसांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. 106 हुतात्म्यांनी या मुंबईसाठी बलिदान दिलं आहे. मराठी माणसांमुळं मुंबईला वैभव मिळालंय. राज्यपालांनी काही खुलासा याबाबत केला आहे. पण त्यांनी कुणाचा अवमान होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे, असं ते म्हणाले. मुंबईत इतर राज्यातील लोकंही रोजगार मिळवतात, मात्र ते मुंबईच्या असलेल्या महत्वामुळं मिळत असतं. त्याचा अवमान कुणालाही करता येणार नाही. मुंबईवर अनेक प्रसंग आले, अनेक संकटं पाहिली. पण संकटकाळातही मुंबई थांबली नाही. करोडो लोकांनी मुंबई रोजगार देतेय, त्यामुळं असं अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं ते म्हणाले.
देशाच्या विकासात मराठी माणसांचा सहभाग सर्वाधिक- फडणवीस
फडणवीस म्हणाले की, राज्यपालांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसांचं कार्य सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाची प्रगती लक्षणीय आहे. त्यांचं जगभरात नाव आहे. वेगवेगळ्या समाजाचं योगदान नाकारता येत नाही पण महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक, मराठीतील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा सहभाग जास्त आहे. एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यावर अतिशयोक्ती अलंकार वापरला जातो तसा त्यांनी वापरला. त्यांच्या मनात मराठी माणसांबद्दल श्रद्धा आहे. त्यांना जाणिव आहे की, या देशाच्या विकासात मराठी माणसांचा सहभाग सर्वाधिक आहे, असंही फडणवीस म्हणाले. राज्यपाल काय बोलले याबाबत ते खुलासा करतील पण आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे.
नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला- राज्यपालांचं स्पष्टीकरण
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या भाषणासंदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला, असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केले आहे.
राज्यपालांनी नेमकं काय म्हटलं आहे...
कधी कधी मी इथं लोकांना म्हणतो की, महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढा, तर तुमच्याकडे पैसाच राहणार नाही. तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही, असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
'महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोकेवाले कोणत्या झाडी डोंगरात लपलेत'; राज्यपालांविरोधात संजय राऊत आक्रमक, केले धडाधड ट्वीट