(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विराटला कसोटीत अव्वल स्थानी झेप घेण्याची संधी
एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या विराटला कसोटी क्रिकेटमध्येही नंबर वन बनण्याची विराटला संधी आहे.
मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. कसोटी क्रिकेटमध्येही विराट नंबर वन बनण्याच्या तयारीत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ सध्या कसोटी क्रिकेटमध्ये क्रमवारील अव्वल स्थानी आहे. मात्र बॉल टेम्परिंगप्रकरणी स्मिथवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यावर वर्षभर बंदी आहे. त्यामुळे विराटला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर कब्जा करण्याची मोठी संधी आहे.
इग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत स्टिव्ह स्मिथला पछाडण्याची संधी विराटला मिळणार आहे. इंग्लंड दौऱ्यात भारत 5 कसोटी सामने खेळणार आहे. स्मिथ सध्या कोहलीच्या 26 अंक पुढे आहे. त्यामुळे स्मिथला मागे टाकण्यासाठी विराटला मालिकेत चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे.
आसीसीच्या क्रमवारीत पहिल्या 50 खेळाडूंमध्ये भारताचे आणि इंग्लंडचे प्रत्येकी पाच-पाच खेळाडू आहेत. या यादीत भारताचा चेतेश्वर पुजार सहाव्या, लोकेश राहुल 11व्या, अजिंक्य रहाणे 19व्या, मुरली विजय 23व्या आणि शिखर धवन 24व्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा जो रुट तिसऱ्या, अॅलिस्टर कूक 13व्या, जानी बेयरस्टा 16व्या, बेन स्टोक्स 28व्या, मोईन अली 43व्या स्थानावर आहे.
गोलंदाजीत इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर आहे. स्टुअर्ट ब्रॉड या यादीत 12व्या स्थानावर आहे. तर भारताचे सहा गोलंदाज पहिल्या 30 मध्ये आहेत. रविंद्र जडेजा तिसऱ्या स्थानावर आहे. आर अश्विन पाचव्या, मोहम्मद शमी 17व्या, भुवनेश्नर कुमार 25व्या ईशांत शर्मा 26व्या आणि उमेश यादव 28व्या स्थानावर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये क्रमवारीत भारतीय संघ 125 अंकांसह पहिल्या स्थानावर आहे, तर इंग्लंड 97 अंकांसह पाचव्या स्थानावर आहे. इंग्लड आणि भारत यांच्या 28 अंकाचा फरक आहे.