Asian Champions Trophy 2021: हॉकी विश्वातील एक मानाची स्पर्धा असणारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 (Asian Champions Trophy) मध्ये सेमीफायनलमध्ये जपानकडून पराभूत झाल्यानंतरही तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात भारताने (Indian Hockey Team) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मात देत कांस्य पदक खिशात घातलं आहे. भारताने पाकिस्तान (IND Vs PAK) संघाचा 4-3 च्या फरकाने धुव्वा उडवला आहे. 



स्पर्धेत भारतीय संघाने सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली होती. उपांत्यपूर्व फेरीतही पाकिस्तानला 3-1 ने पराभूत करुन भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. पण सेमीफायनलमध्ये मात्र जपानने भारताचा 5-3 च्या फरकाने दारुण पराभव केला. ज्यानंतर भारताला किमान तिसरं स्थान अर्थात कांस्य पदक मिळवण्याची संधी होती. त्यासाठी भारताला पाकिस्तानच्या संघावर विजय मिळवणं गरजेचं होतं. 


असा पार पडला सामना


सामन्यात भारत आणि पाकिस्तान दोघांनी पहिल्या हाफमध्ये प्रत्येकी एक-एक गोल केला. त्यानंतर दुसऱ्या हाल्फची सुरुवात पाकिस्तानने आक्रमक केली. त्यांनी एक गोल देखील केला. पण त्यानंतर भारताने जोरदार पुनरागमन करत तीन गोल्स केले. ज्यामुळे दोन गोल्सच्या आघाडीसह स्कोरबोर्ड 4-2 झाला. ज्यानंतर शेवटच्या काही मिनिटांत पाकिस्तानने एक गोल केला खरा, पण भारताच्या चार गोल्सशी बरोबरी न करु शकल्याने पाकिस्तान 4-3 ने अखेर पराभूत झाला. सामन्यात भारताचा कर्णधार मनप्रीत सिंगला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha