Shaheen Shah Afridi out of Asia Cup : आशिया कप टी-20 स्पर्धेपूर्वी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शाहीनला इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतही खेळता येणार नाही. आशिया कपमध्ये पाकिस्तानचा पहिला सामना 28 ऑगस्टला भारताविरुद्ध होणार आहे. यानंतर 4 सप्टेंबर रोजी दोन्ही संघांमध्ये पुन्हा एक सामना होणार आहे.
पुनरागमन करण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) निवेदन जारी करून शाहीन स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती दिली. अफ्रिदीला पुनरागमन करण्यासाठी 4 ते 6 आठवडे लागतील, असेही बोर्डाने म्हटले आहे. स्कॅन रिपोर्ट आल्यानंतर पीसीबीने तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. यानंतर जास्त काळ खेळू शकणार नसल्याचे निश्चित झाले.
भारताच्या टॉप ऑर्डरला दिलासा
शाहीन आफ्रिदी बाहेर पडल्याने भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरला मोठा दिलासा मिळाला आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शाहीनने जवळपास 70% सामन्यांमध्ये पहिल्याच षटकात विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात पहिल्याच षटकात त्याने रोहित शर्माची विकेट घेतली होती. यानंतर त्याने केएल राहुल आणि विराट कोहलीलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्या सामन्यात टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. विश्वचषकात पाकिस्तानकडून भारताचा हा पहिलाच पराभव ठरला.
विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त होण्याची आशा
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापर्यंत शाहीन फिट होईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आशिया चषक आणि विश्वचषक दरम्यान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सात टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. शाहीन या मालिकेत उपलब्ध होणार नाही.
आशिया कपसाठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर.