Deepak Chahar for Asia Cup : क्रिकेट विश्वात आशिया खंडातील देशांसाठी एक मोठी आणि मानाची क्रिकेट स्पर्धा असणाऱ्या आशिया कप 2022 (Asia Cup 2022) साठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशामध्ये या भव्य स्पर्धेसाठी भारतानं संघ जाहीर केला असून यात दीपक चाहरला (Deepak Chahar) राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आलं आहे. पण मागील काही वर्षात दमदार फॉर्मात आलेला दीपक आता झिम्बाब्वेविरुद्धही चमकला आहे, ज्यामुळे त्याला आशिया कपसाठी भारतीय संघात घेण्याची मागणी क्रिकेट फॅन्स करत आहेत.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना तब्बल 10 विकेट्सनी जिंकत भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. यावेळी सामनावीर ठरलेल्या दीपकनं 7 षटकांत केवळ 27 रन देत 3 महत्त्वाचे विकेट्स घेतले. ज्यानंतर त्याला आशिया कप तसंच आगामी टी20 विश्वचषकासाठीही संघात घ्या अशा मागणीला उधाण आलं आहे. दीपक हा एक युवा वेगवान गोलंदाज असून चेन्नई सुपरकिंग्सचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. पण मागील काही काळापासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. पण आता झिम्बाब्वे दौऱ्यात त्यानं दमदार पुनरागमन केलं आहे.
कसा आहे भारतीय संघ?
यंदाच्या आशिया कप 2022 साठी रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकणार आहे. विराटलाही संघात संधी मिळाली असून नेमकी टीम कशी आहे पाहूया...
टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
राखीव - दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल
अनुभवी खेळाडूंनाही डच्चू
भारतीय संघाचा विचार करता यामध्ये काही दिग्गज खेळाडूंना डावलण्यात आलं आहे. ज्यामध्ये सलामीवीर शिखऱ धवन, गोलंदाज मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. शिखर मागील काही काळापासून फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्येहील त्याने चांगली कामगिरी केली. पण तरीही त्याला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळालं नाही. याशिवाय मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाजही संघात नसल्याचं दिसून आलं आहे. बुमराह दुखापतीमुळे बाहेर असल्याने अनुभवी गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमारच संघात आहे. तसंच ईशान किशन, संजू सॅमसन या युवांनाही संधी मिळालेली नाही. दीपक हुडाला मात्र संघात स्थान मिळालं आहे.
हे देखील वाचा-