एक्स्प्लोर
Asia Cup सुपर फोर : भारताकडून बांगलादेशचा 7 विकेट्सनी धुव्वा
रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी नाबाद 83 धावांची खेळी केली.

अबुधाबी : आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या टीम इंडियाने बांगलादेशचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी दिलेलं 174 धावांचं लक्ष्य 37 व्या षटकांत पार केलं. भारताच्या विजयात रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी उभारली. त्याने पाच चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 83 धावांची खेळी केली. रोहितने धवनच्या साथीने 61 धावांची सलामी देऊन भारतीय विजयाचा पाया रचला. रोहितने अंबाती रायुडूच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित आणि धोनीने तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचून भारताला विजयी लक्ष्याच्या जवळ नेलं. त्याआधी, या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा डाव अवघ्या 173 धावांत गुंडाळला. दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याऐवजी भारताच्या वन डे संघात पुनरागमन करणारा रवींद्र जाडेजा कानामागून आला आणि बांगलादेशला तिखट झाला. सौराष्ट्रच्या या डावखुऱ्या स्पिनरनं 29 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा या दोघांनी बांगलादेशच्या प्रत्येकी तीन फलंदाजांच्या विकेट्स काढल्या. आशिया चषकाच्या अ गटातून भारत आणि पाकिस्तान, तर ब गटातून बांगलादेश आणि अफगाणिस्ताननं सुपर फोर साखळीत धडक मारली आहे. सुपर फोर साखळीत चारही संघ एकमेकांशी खेळणार आहेत. भारत आणि पाकिस्तान संघांमधला सुपर फोरचा दुसरा सामना रविवारी म्हणजे अनंत चतुर्दशीला खेळवण्यात येईल. भारताचा तिसरा सामना अफगाणिस्तानशी होईल. तो सामना येत्या मंगळवारी होईल.
आणखी वाचा























