Team India : 3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाज, आशिया कपसाठी संभाव्य टीम इंडिया, प्लेईंग XI मध्ये कुणाला संधी?
India Playing 11, Asia Cup 2025: आशिया कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. उद्या भारताचा संघ जाहीर होणार आहे.

नवी दिल्ली: आशिया कपची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. टीम इंडियाची पहिली मॅच 10 सप्टेंबरला होणार आहे. यावेळी आशिया कप टी20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. अबू धाबी आणि दुबईत हे सामने होणार आहेत. पिच आणि वातावरण लक्षात घेता टीम इंडिया संघात 3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाजांना स्थान देऊ शकते. हार्दिक पांड्या देखील वेगवान गोलंदाजी करु शकतो, म्हणजे भारतीय संघात गोलंदाजीचे 6 पर्याय असतील.
भारतानं अद्याप आशिया कपसाठी संघाची घोषणा केलेली नाही. रिपोर्टनुसार मंगळवारी 19 ऑगस्टला भारतीय संघ जाहीर केला जाणार आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे भारताच्या डावाची सुरुवात करतील. गौतम गंभीरचा संजू सॅमसनवर विश्वास असल्यानं त्याला संधी मिळू शकेल. तिसऱ्या स्थानासाठी तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यरच्या नावाची चर्चा आहे, मात्र तिलक वर्मा गेल्या अनेक दिवसांपासून भारताच्या टी 20 संघातून खेळतोय. मात्र, श्रेयस अय्यरनं आयपीएलमध्ये 600 हून अधिक धावा करत आपली दावेदारी सिद्ध केली आहे.
मधल्या फळीत सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानावर खेळेल. तर, पाचव्या स्थानावर अक्षर पटेल, सहाव्या स्थानावर हार्दिक पांड्या खेळेल. सातव्या स्थानावर जितेश शर्माला संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये जितेश शर्मा फिनिशर म्हणून समोर आला होता.
गोलंदाजीचा विचार केला असता वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवला संघात स्थान मिळेल. याशिवाय अक्षर पटेल तिसरा फिरकीपटू म्हणून संघात असेल. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग हे मुख्य वेगवान गोलंदाज असतील. हार्दिक पांड्या देखील तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून कामगिरी करु शकतो. इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला संधी मिळणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
आशिया कपसाठी भारताचा संभाव्य संघ- संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा/श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा/शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)
9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना
























